मोदींच्या सभेत भाषण करण्यापासून रोखल्याने खासदार दिलीप गांधी भरसभेत भडकले !

0

अहमदनगर:पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये सभा घेत आहे. दरम्यान यावेळी मोदींचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांनी भाषण सुरु केले. त्यांनी भाषण सुरु केल्याच्या काही मिनिटानंतर त्यांना लागलीच भाषण थांबविण्याबाबत चिठ्ठी पाठविण्यात आली. त्यामुळे ते चांगलेच संतापले. मी अजून १० मिनिटे बोलणार आहे. मला बोलू द्या, अशा शब्दांत त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांच्यावर रोष व्यक्त केला. भरसभेत मतदारांसमोर हा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील पक्षांतर्गत मतभेद समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

खासदार दिलीप गांधी हे भाषणातून विकासकामांबद्दल जनतेला माहिती देत होते. त्याचवेळी जिल्हाध्यक्ष बेरड यांनी त्यांना अर्ध्यावरच भाषण थांबवायला सांगितले, त्यावर दिलीप गांधी हे प्रचंड चिडले. मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही, असे म्हटले जात आहे. पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळे काही आहे, असे म्हणत त्यांनी भाषण सुरूच ठेवले. बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. व्यासपीठावरील माइक मिनिटभरासाठी बंद होता.