नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात महिला कमांडोजचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. सध्या सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये स्वयंचलित अद्ययावत शस्त्रांसोबत एक महिला कमांडो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अशा प्रकारे पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एखाद्या महिला कमांडोला दिली असल्याचा दावा करण्यात येत आहे. लेडी कमांडो म्हणजे मोदी सरकारच्या काळात स्त्रीशक्तीचं वाढते प्रतीक असल्याचे बोलले जात आहे. पहिल्यांदाच पंतप्रधानांसाठीच्या एसपीजी म्हणजेच ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’मध्ये एखाद्या महिला कमांडोचा समावेश करण्यात आला आहे. युरोप दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विमानतळावर सोडण्यासाठी जो सुरक्षेचा ताफा गेला, त्या पथकामध्ये पहिल्यांदाच महिला कमांडो पाहायला मिळाली. काळ्या सफारीत काळ्या गॉगलमध्ये या एसपीजी महिलेला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
शस्त्र चालवण्यात पारंगत
या महिला कमांडोकडे टेक्निकल आयवीयर म्हणजेच जो काळा गॉगल घातला आहे त्यामुळे हल्ल्याच्यावेळी एसपीजी कमांडोजचा बचाव करतो. या एसपीजी कमांडोंच्या सूटसच्या आतमध्ये बुलेटप्रुफ जॅकेट असतं. हे जॅकेट 10 मीटर लांबून चालविलेली एके47 बंदुकीची गोळीही झेलू शकते. या कमांडोजकडे बेल्जियम बनावटीची नाटो कॅलिबर रायफल असते. ही साडे तीन किलोची रायफल दर मिनिटाला 850 राऊंडस फायर करू शकते. या कमांडोजच्या कानात ईयर प्लग आहेत ज्याच्यामाध्यमातून ते आपल्या टीमसोबत संवाद साधतात आणि त्यांनी दिलेले कमांडही फॉलो करतात.
एसपीजीची सुरक्षा
एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. देशातल्या व्हीव्हीआयपींना ही सुरक्षा दिली जाते. देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रकारची सुरक्षा पुरवण्यात येते. एसपीजी कमांडोज हे लष्कराचे अधिकारी असतात. एसपीजी कमांडोज अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असतात.