वाराणसी – भारतातील सर्वात लांब आणि पवित्र नदी असलेल्या गंगा नदीमधून आता मालवाहतूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यात वाराणसी-हल्दिया नॅशनल वॉटर वे -१ वरील देशातील पहिल्या मल्टी मॉडेल टर्मिनलचे उदघाटन केले. वाराणसीमधील खिडकिया घाट येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मल्टी मॉडेल टर्मिनल देशाला समर्पित केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी मोदींनी हल्दीया येथीन आलेल्या टागोर जहाजावरील कंटेनर अनलोडिंग करण्याचे कामही सुरू केले.
मल्टी मॉडेल टर्मिनल २०६ कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात आले आहे. या टर्मिनलची जेटी २०० मीटर लांब आणि ४५ मीटर रुंद आहे. येथे मालाचा चढ उतार करण्यासाठी जगातील अत्याधुनिक हेवी क्रेन लावण्यात आली आहे. जर्मनीत तयार केलेल्या या मोबाइल हार्बर क्रेनची किंमत २८ कोटी एवढी आहे.
हल्दीया जलमार्ग सुरू झाल्याने सागरमाला प्रोजेक्टद्वारे भारत दक्षिण आशियातील व्यापारामध्ये चीनप्रमाणेच आपली दमदार उपस्थिती दर्शवण्यात सक्षम होणार आहे. वाराणसी – हल्दीया जलमार्गामुळे गंगेच्या मार्गातून व्यापार वाढून रामनगर टर्मिनलद्वारे उत्तर भारताला पूर्व आणि पूर्वोत्तर भारताशी तसेच बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि अन्य दक्षिण आशियाई देशांशी जोडणे शक्य होणार आहे.