नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने केली आहे. एका ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या हाती एक ई-मेल लागला असून त्यामध्ये ‘किल नरेंद्र मोदी’ असे लिहिण्यात आले आहे. यासंदर्भात एनआयएने केंद्रीय गृहमंत्र्यालयाला पत्र पाठविले असल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचे या ई-मेलमधून दिसून येत आहे. मोदींच्या जीवाला धोका असल्याचे ई-मेलमधील माहितीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या ई-मेलसंदर्भात एनआयएने कोणतीही चौकशी अद्याप केलेली नसून सर्वात आधी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवण्यात आले आहे.
हा ई-मेल ylalwani12345@gmail.com या ई-मेल आयडीवरुन मुंबईतील एनआयच्या ई-मेलआयडीवर पाठवण्यात आला आहे. हा ई-मेल आठ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजून २६ मिनिटांनी पाठवण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये Kill Narendra Modi असा तीन शब्दांचा मजकूर आहे. या प्रकरणामध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला माहिती दिली आहे. मल्टी एजन्सी कॉर्डिनेश सेंटरला यासंदर्भातील माहिती देण्यात आली असून या टीममध्ये रॉ म्हणजेच भारताची गुप्तचर विभाग, इंटेलिजन्स ब्युरो, सुरक्षेसंदर्भातील इंटेलिजन्स यंत्रणांमधील अधिकाऱ्यांचा समावेश असून याबद्दलचा तपास सुरु करण्यात आला असल्याचे समजते. हा ई-मेल भारताच्या बाहेरुन पाठवण्यात आला असल्याचेही प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे.