मोदींना पराभवाची चाहुल!

0

सरकारच्या निर्णयांची राजकीय किंमत चुकवण्यास तयार : मोदी; नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, काळ्या पैशाला चाप बसल्याचा दावा
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशभरात निर्माण झालेला अभूतपूर्व पेच, अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था आणि उफाळलेली बेरोजगारी यामुळे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निर्माण झालेल्या जनमताची जाणिव अखेर मोदी यांना झाली आहे. देशभरात सरकारविरोधात लाट निर्माण झाल्यानंतर गुजरात विधानसभा निवडणूक व आगामी लोकसभेची निवडणूक पाहाता, मोदींना आतापासून जनमताचा कानोसा आला असून, त्याबाबत सूचक वक्तव्याद्वारे त्यांनी संकेतही दिले आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे भ्रष्टाचाराला चाप बसल्याचे सांगत, भ्रष्टाचाराविरोधातील या लढ्याची राजकीय किंमत चुकवण्यासही मी तयार आहे, असे उद्गार मोदींनी काढले आहेत. नवी दिल्लीतील ‘हिंदुस्तान टाईम्स समीट’मध्ये बोलताना त्यांनी अपरोक्षरित्या आगामी पराभवांची कबुली दिली. भ्रष्टाचाराविरोधात घेतलेल्या भूमिकेची राजकीय किंमत मला चुकवावी लागू शकते. मी ती किंमत चुकवण्यास तयार आहे, असे सांगून सरकारचा हेतू अतिशय प्रामाणिक आहे. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही प्रामाणिकपणे काम केले. नोटाबंदीमुळे काळा पैसा उजेडात आला. काळा पैशांची समांतर अर्थव्यवस्था यामुळे संपुष्टात आली. नोटाबंदीमुळे लोकांच्या वर्तणुकीतही बदल झाला, अशी मखलाशीही मोदींनी केली.

काँग्रेसने अर्थव्यवस्था संकटात टाकली होती!
या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था, नोटाबंदी, जीएसटीसह इतर मुद्द्यांवर भाष्य केले. नोटाबंदीचा निर्णय यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले. मी देशासाठी एक ध्येय निश्चित केले आहे. ते गाठण्यासाठी ज्या मार्गावरून चाललो आहे, त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल याची मला कल्पना आहे. पण आता एक पाऊलही मागे हटणार नाही, असेही मोदी म्हणाले. देशात परिवर्तन व्हावे यासाठी 2014 मध्ये आम्हाला मते दिली होती. सव्वाशे कोटी जनतेचा विश्वास हाच देशाच्या विकासाचा पाया आहे. देशातील गरीब, तरुण, महिला आणि शेतकर्‍यांनी याआधी इतका विश्वास कोणावरही ठेवला नाही, असेही मोदी म्हणाले. आगामी काळात रोकडरहित व्यवहारांमध्ये वाढ होणार असून, त्यामुळे काळ्या पैशाला लगाम लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे करप्रणाली पारदर्शक झाल्याचा दावा त्यांनी केला. जीएसटीमुळे करप्रणाली सुटसुटीत झाली. आधार कार्डमुळे बेनामी संपत्तीविरोधात कारवाई करता आली, असे मोदींनी म्हटले. यावेळी त्यांनी आधीच्या काँग्रेस सरकारवरही तोफ डागली. आम्ही 2014 मध्ये सत्तेत आलो, त्यावेळी आम्हाला संकटात सापडलेली अर्थव्यवस्था वारसा म्हणून मिळाली. बँकिंग क्षेत्रदेखील अडचणीत होते. समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश होत होता, अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.

विदेशात भारतीय ताठ मानेने जगत आहेत!
आता भारतीय ताठ मानेने परदेशात जगत आहेत. ‘अब की बार कॅमेरुन सरकार’, ‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशा घोषणांमधून भारताबद्दलचा वाढता विश्वास दिसून येतो, असेही मोदींनी याप्रसंगी सांगितले. यावेळी मोदींनी टीकाकारांनादेखील उत्तर दिले. जादूची कांडी फिरवून देशातील परिस्थिती बदलू शकत नाही, असे वाटणारे निराशावादी असतात. मात्र अशा लोकांमुळे आम्ही हातावर हात ठेवून बसू, असे होणार नाही. आम्ही जोखीम पत्करण्यासाठी तयार आहोत. या सरकारची मानसिकता वेगळी आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी टीकाकारांना उत्तर दिले. जन धन योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेकडेदेखील त्यांचे स्वत:चे बँक खाते आले तर स्वच्छ भारत अभियानच्या मदतीने लोकांचे जीवनमान सुधारले आणि उज्वला योजनेच्या माध्यमातून कित्येक महिलांचे जीवन सुधारले, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जनतेला राजकीय किंमत चुकवावी लागतेय!
भ्रष्टाचारविरोधातील लढ्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची राजकीय किंमत चुकवण्यासही मी तयार आहे, असे म्हणणार्‍या पंतप्रधान मोदींवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी सडकून टीका केली. करात म्हणाल्या, सरकारच्या निर्णयांमुळे पंतप्रधानांना राजकीय किंमत चुकवावी लागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट मोदी आणि त्यांच्या पक्षाला मते देऊन जनतेलाच राजकीय किंमत चुकवावी लागत आहे. सध्या देशात महागाईने कळस गाठला असून, आज कांदा 70 रूपये किलो या भावाने विकला जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील जनतेच्या डोळ्यात पाणी आले आहे, याला केवळ सरकार जबाबदार आहे.