मोदींना पर्याय म्हणून काँग्रेस पवारांना स्वीकारेल काय?

0

काँग्रेसला पुन्हा आपले वैभवाचे दिवस परत आणायचे असतील तर आधी मार्गातील मोदी नावाचा मोठा अडसर दूूर करावा लागेल. त्यासाठी तूर्तास थोडी माघार घेऊन शरद पवारांसारख्या नेत्यांना काँग्रेसने पाठबळ पुरवावे, तसे झाले तरच त्यानंतरचे दिवस काँग्रेसचेच असतील; परंतु तसे न करता आताच काँग्रेसने राहुल गांधींना थेट मोदींसमोर रणांगणात आणले आणि राहुल गांधींना पराभव स्वीकारावा लागला, तर पुढे भविष्यात राहुल गांधी कधी पंतप्रधान होतील, याची शाश्‍वती देता येणार नाही. तात्पर्य सद्य परिस्थितीत विरोधक आणि काँग्रेससमोर असलेले मोठे आव्हान परतविणे हेच लक्ष्य विरोधकांचे असेल, तर तूर्तास शरद पवारांसारखा तुल्यबळ नेता मोदींच्या विरोधात उभा करणे हीच काळाची गरज आहे.

देशातील राजकीय वातावरण झपाट्याने बदलत आहे. तीन वर्षांपूर्वी मोदींची जी हवा होती ती आता राहिलेली नाही. अगदी आपल्या गृहराज्यात गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपला अक्षरश: घाम गाळावा लागत आहे. गुजरातमधील भाजपविरोधी वातावरणाचा अचूक लाभ विरोधक घेऊ शकले, तर गेल्या बावीस वर्षांपासून गुजरातमध्ये असलेली भाजपची सत्ता उलथवून टाकण्यात विरोधक यशस्वी होतील. सध्या तरी गुजरात निवडणूक अतिशय चुरशीच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. विजयाचे पारडे कुणाकडेही झुकू शकते, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचे मनोनित अध्यक्ष राहुल गांधी कोणत्याही परिस्थितीत गुजरात जिंकायचेच या जिद्दीला पेटले आहेत. या केवळ एका विजयाने त्यांचे आजवरचे अपयश धुतल्या जाऊ शकते याची त्यांना आणि काँग्रेसलाही कल्पना आहे. त्या अर्थाने गुजरातची निवडणूक काँग्रेससाठी ’माईलस्टोन’ ठरणार आहे; परंतु खरा प्रश्‍न पुढचा आहे. राजकीय विश्‍लेषक गुजरात निवडणुकीची चर्चा पुढील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करीत आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसला यश मिळाले तर नि:संशय राहुल गांधी विरोधकांचे नेते म्हणून समोर येतील किंवा काँग्रेस त्यांनाच पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पुढे करेल. खरी समस्या इथेच आहे. गुजरातमध्ये भाजपला यश मिळाले, तर त्याचा अर्थ मोदी सरकारच्या धोरणावर लोकांनी शिक्कामोर्तब केले असा लावला जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून मोदी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण तसेच कायम राहील. नोटाबंदी, जीएसटीने देशातील शेतकर्‍यांचे, सामान्य व्यापार्‍यांचे पार कंबरडे मोडले आहे. काही मोजकी बडी उद्योजक घराणी आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यांचेच हित मोदी सरकार जपत आहे, परंतु गुजरातमध्ये भाजप विजयी झाला, तर ही वस्तुस्थिती नाकारली जाईल आणि मोदी सरकार योग्य काम करीत असल्याचा निष्कर्ष काढला जाईल. तसे झाले तर देशाचे आणि विशेषत: शेतकर्‍यांचे भवितव्य काय असेल, हे सांगण्याची गरज नाही. हे होऊ द्यायचे नसेल तर गुजरातमध्ये भाजपला पराभूत करावेच लागेल. शिवाय, गुजरातमध्ये भाजपचा विजय झाला, तर विरोधी पक्षाच्या आत्मविश्‍वासावर मोठा आघात होईल, त्यांच्यात एकजूट होऊ शकणार नाही आणि अशा दुभंगलेल्या विरोधकांना नमविणे भाजपला जड जाणार नाही. एकूण काय तर गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणे अतिशय गरजेचे आहे; परंतु तसा तो झाला तरी विरोधकांची पुढची वाटचाल तितकी सोपी नसेल, याचे महत्त्वाचे कारण गुजरातच्या विजयाचे संपूर्ण श्रेय काँग्रेस केवळ राहुल गांधींना देईल आणि भविष्यात राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारणार्‍या पक्षांसोबतच काँग्रेसची युती होईल किंवा काँग्रेस युती करेल. वर म्हटल्याप्रमाणे खरी समस्या इथेच आहे.

गुजरातच्या निवडणुकीत राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नाहीत, त्या अर्थाने त्यांच्यात थेट लढत नाही; परंतु लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हे दोघेही पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकतील. त्या परिस्थितीत मोदींचा पर्याय म्हणून लोक राहुल गांधींना स्वीकारतील का, हाच खरा प्रश्‍न आहे. राहुल गांधी राजकीयदृष्ट्या अधिकाधिक परिपक्व होत आहेत, हे मान्य केले तरी जेव्हा सामना थेट मोदींशी असेल तेव्हा त्यांची बाजू खूपच लंगडी ठरू शकते. गुजरातमधील संभाव्य विजयाचा अर्थ लोकांनी मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधींना स्वीकारले, असा काँग्रेसकडून लावल्या गेल्यास ते जवळजवळ आत्मघाती पाऊल ठरेल. गुजरातमध्ये शेतकरी, कष्टकरी, दलित, पाटीदार असे अनेक समूह भाजपवर नाराज आहेत, त्यांचा मोदींवर रोष आहे आणि तो मतपेटीतून व्यक्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अर्थाने विश्‍लेषण करायचे झाल्यास नकारात्मक मतांचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. म्हणजे हा संभाव्य विजय मोदींवरच्या रोषाचा परिणाम असेल, परंतु त्याचा अर्थ राहुल गांधींना लोकांनी स्वीकारले असा लावल्या जाऊ शकत नाही. राहुल गांधींना लोकांनी पर्याय म्हणून स्वीकारले असते, तर आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये किमान समाधानकारक कामगिरी काँग्रेसला करता आली असती. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर गुजरातसोबतच हिमाचलप्रदेशातही निवडणूक झाली आहे. तिथे काँग्रेसचा विजय अशक्यप्राय मानला जात आहे. जर गुजरातच्या संभाव्य विजयाचा अर्थ राहुल गांधींना लोकांनी पर्याय म्हणून स्वीकारले असा लावल्या गेला, तर हिमाचलच्या संभाव्य पराभवाचा अर्थ तिथल्या लोकांनी राहुल गांधींना नाकारले असाच लावावा लागेल. याच काळात उत्तरप्रदेशातही विधानसभा आणि नुकत्याच महापालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. राहुल गांधींच्या अमेठीतही काँग्रेसला विजय मिळविता आला नाही, त्याचे विश्‍लेषण कसे करता येईल? मुळात एक बाब सर्वच विरोधी पक्षांनी लक्षात घ्यायला हवी, की मोदी सरकारच्या धोरणांचा सगळ्यात मोठा फटका या देशातील शेतकर्‍यांना बसला आहे. मतदार म्हणून शेतकर्‍यांची एक प्रचंड मोठी संख्या या देशात आहे. या शेतकर्‍यांना एकत्र करून त्यांची एक मतपेढी तयार करायची असेल तर देशभरातील शेतकर्‍यांना स्वीकार्ह असेल असे नेतृत्व विरोधकांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून समोर करायला हवे. राहुल गांधींमध्ये सध्या तरी ती क्षमता नाही. मुळात विरोधकांकडे लोकसभा निवडणुकीत मोदींना टक्कर देऊ शकेल असा उमेदवारच नाही. नीतीशकुमार मोदींना टक्कर देऊ शकले होते, परंतु भविष्यात राहुल गांधींना स्पर्धक ठरतील म्हणून काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. आज नीतीशकुमार भाजपच्या गोटात जाऊन बसले आहेत. अन्य पर्यायी नावांमध्ये ज्यांची चर्चा करता येईल त्यापैकी मुलायमसिंग हे आता राजकारणातून बाद ठरलेले नाणे आहे. लालूप्रसादांना पर्याय म्हणून समोर करणे म्हणजे भाजपला आयते ताट वाढून समोर केल्यासारखे होईल. ममता बॅनर्जी पश्‍चिम बंगालच्या बाहेर केवळ गुरगुरण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत आणि मायावती तर आपल्याच अस्तित्वासाठी सध्या झगडत आहेत. या पृष्ठभूमीवर विरोधी पक्ष त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या एकमेव सक्षम पर्यायाचा विचार करू शकतात आणि तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.

देशभरातील शेतकर्‍यांमध्ये शरद पवारांची लोकप्रियता आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, शरद पवार आपल्या भल्याचे निर्णय घेतील असा विश्‍वास शेतकर्‍यांना वाटतो, राजकीयदृष्ट्या ते परिपक्व आहेत आणि मोदींच्या राजकीय खेळींना प्रत्युत्तर देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. काँग्रेससहीत सगळ्याच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले, तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून पायउतार केले जाऊ शकते. यासाठी अर्थात सगळ्यात आधी काँग्रेसने राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा अट्टाहास बाजूला सारणे गरजेचे आहे. राहुल गांधी तरुण आहेत, पुढची अनेक वर्षे त्यांना राजकारण करायचे आहे. सध्या त्यांच्यासमोर मोठे आव्हान भाजप आणि मोदींचे आहे. त्यांनी एक बाब लक्षात घ्यायला हवी, की पुढच्या लोकसभेत पुन्हा भाजप सत्तेत आली आणि पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर काँग्रेसला, पर्यायाने राहुल गांधींना आपले अस्तित्वही टिकविता येणार नाही. काँग्रेसला पुन्हा आपले वैभवाचे दिवस परत आणायचे असतील तर आधी मार्गातील मोदी नावाचा मोठा अडसर दूूर करावा लागेल. त्यासाठी तूर्तास थोडी माघार घेऊन शरद पवारांसारख्या नेत्यांना काँग्रेसने पाठबळ पुरवावे, तसे झाले तरच त्यानंतरचे दिवस काँग्रेसचेच असतील; परंतु तसे न करता आताच काँग्रेसने राहुल गांधींना थेट मोदींसमोर रणांगणात आणले आणि राहुल गांधींना पराभव स्वीकारावा लागला, तर पुढे भविष्यात राहुल गांधी कधी पंतप्रधान होतील, याची शाश्‍वती देता येणार नाही. तात्पर्य सद्य परिस्थितीत विरोधक आणि काँग्रेससमोर असलेले मोठे आव्हान परतविणे हेच लक्ष्य विरोधकांचे असेल, तर तूर्तास शरद पवारांसारखा तुल्यबळ नेता मोदींच्या विरोधात उभा करणे हीच काळाची गरज आहे. अन्यथा गुजरातमध्ये पराभव झाला तरी मोदी पुन्हा उसळून वर येतील आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील विरोधकांना त्यांचा सामना करणे खूप जड जाईल. मोदींसमोर आव्हान कोण उभे करू शकतो, हाच खरा प्रश्‍न आहे आणि सध्या तरी राहुल गांधी हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. शरद पवार हेच सक्षम पर्याय ठरू शकतात, परंतु त्यांना नेते म्हणून स्वीकारण्याचा मोठेपणा काँग्रेस दाखवेल काय? आणि पवार त्याला प्रतिसाद देतील काय? हेच खरे यक्षप्रश्‍न आहेत.

– प्रकाश पोहरे