मुंबई । ‘देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. देशभरातील अनेक राज्यांमधील मोठ-मोठ्या राज्यांतील ‘एटीएम’च्या मशिन्स रिकाम्या झाल्या आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात जाऊन आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मनमोहनसिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले आहेत. हा काळाने भाजपवर उगवलेला सूडच म्हणावा लागेल. मोदी यांचा मनमोहन झाला आहे, अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी भारतात असताना ‘मौनी बाबा’ असतात, परंतु, परदेशी भूमीवर ते बोलके होतात. स्वदेशात त्यांना बोलूच नये असे वाटते. येथे घडणार्या घटनांचा त्यांना उबग येतो. मग ते परदेशात जातात व स्वदेशातील घटनांवर बोलतात. सध्या मोदी परदेश दौर्यावर आहेत. ते आधी स्वीडन दौर्यावर होते. तिथेही स्वदेशातील घटना व घडामोडींवर बोलले. आता ते लंडनला पोहोचले व तेथूनही त्यांनी स्वदेशवासीयांना संदेश दिला आहे. म्हणजे आमच्या पंतप्रधानांना देशातील बर्यावाईट घटनांविषयी ‘व्यक्त’ होताना पाहायचे असेल तर हिंदुस्थानची राजधानी लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, पॅरिस, जर्मनी येथे हलवावी लागेल. ते शक्य नसेल तर दिल्लीचे रूपांतर हे सिनेमातील भव्य सेटप्रमाणे परदेशातील शहरात करावे लागेल,’ असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला आहे. एक तर राजधानी दिल्लीतून लंडनला हलवा नाहीतर दिल्लीत परदेशी देखाव्यांचा सेट उभारा. काही झाले तरी मोदींना बोलते करावेच लागेल, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. पंतप्रधान मोदी यांनी लंडन येथे जाऊन जम्मू, कठुआतील ‘बलात्कार’ प्रकरणावर दुःख व्यक्तकेले आहे. हा त्यांच्या संवेदनशील मनाचा भाग आहे. ते हळवे आहेतच तसेच त्यांच्या मनात अन्यायाविरुद्धची ठिणगी पेटती आहे. परदेशात त्या ठिणगीचा भडका उडताना पहायला मिळतो आहे.