मोदींना वाढदिवस भेट म्हणून फक्त 68 पैशांचे चेक

0

गुंटूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाची भेट म्हणून आंध्र प्रदेशातील रायलसीमा सागुनिती साधना समिती या संस्थेने केवळ 68 पैशांचे धनादेश पाठवले आहेत. आंध्रतील रायलसीमा भागातील शेतकरी, मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष होत असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी या संस्थेने हे धनादेश पाठवले आहेत.

आंध्रप्रदेशातील असंख्य शेतकरी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहेत. खायचे काय? याची भ्रांत या सगळ्यांपुढे असते. तसेच अनेकांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागतोय. या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सिंचनाचा प्रश्नही कायम आहे. त्याचमुळे आम्ही हे चेक पाठवले असल्याची प्रतिक्रिया एनजीओचे अध्यक्ष बी. दशरथ रेड्डी यांनी दिली. जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अधोरेखित करायचा आहे. 15 सप्टेंबर ही तारीख घालून सहा धनादेश नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहेत. आम्हाला रायलसीमा भागासाठी विशेष आर्थिक विकास पॅकेज देण्यासाठी आंध्रप्रदेशात पुनर्विकास कायद्यात तरतूद आहे. मात्र आम्हाला अपेक्षेप्रमाणे कोणतीही मदत अद्याप मिळालेली नाही. इथे होणार्‍या विकासकामांचा वेगही मंदावला आहे. पोलाद प्रकल्प, विद्यापीठ, रेल्वे झोन सगळे या भागात येणे अपेक्षित आहे मात्र हा भाग मागासच राहिला आहे, अशी खंत रेड्डी यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही आमच्या प्रश्नांबाबत पत्र लिहिले होते. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची समस्या मिटेल असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र तसे घडले नाही म्हणून आम्ही पंतप्रधानांना 68 पैशांचे सहा धनादेश पाठवून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत.