मंचर ( पुणे ) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाच दिवस उलटले. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. लोकांच्या मागण्यांसाठी आण्णां हजारेंनी मोदींना ३६ पत्रं लिहीले. मोंदीकडून फक्त ‘धन्यवाद’ असे उत्तर पाठवले गेले. यांना PUBG वाल्यांचे प्रश्न सोडवायला वेळ आहे, सामान्यांच्या प्रश्नांसाठी संवेदनशीलता नाही, अशी टीका करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुडे यांनी पंतप्रधान मोदींच्या वागण्याचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आयोजित केलेली परिवर्तन यात्रा आज पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पोहोचली. तीस-या टप्पातील सातव्या दिवशीच्या 14 व्या सभेला धनंजय मुंडे भाषणासाठी उभे राहताच उपस्थितांनी घोषणा देत त्यांचे भव्य स्वागत केले.
नवी नवरी घरात आल्यानंतर काम कमी आणि बांगड्याचा आवाज जास्त करते, जेणेकरून शेजाऱ्यांना वाटेल की नवीन सुनबाई खूप काम करते. मोदींची वर्तणुकही नव्या नवरी सारखीच आहे, काम कमी गवगवा जास्त, अशी खरपूस टीका त्यांनी केली.
मंचरमधील परिवर्तन यात्रेची सभा ही थोडी वेगळी भासली. इतर सभांप्रमाणे या सभेत स्थानिक प्रश्नांबाबतचे एकही निवेदन आलेले नाही. एक निवेदन आलं ते बैलगाडी शर्यत सुरू करण्याबाबतचं. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील साहेबांनी केलेल्या विकासाचा, त्यांच्या नेतृत्वाचा लोकांनी मनापासून स्वीकार केलाय हेच यातून दिसत असल्याचे मुंडे म्हणाले.
सरकारकडे दुष्काळासाठी मागितले ८ हजार कोटी आणि दिले ४ हजार कोटी ही परिस्थिती आज आहेत. त्यामुळे याचा विचार करा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा जुमलेबाजी करणाऱ्या सरकारवर जोरदार प्रहार केला.
या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते रोहित पवार, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे आदींसह मंचर, शिरुर,जुन्नर, खेड, आंबेगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.