विक्रमगड -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा संपूर्ण राज्यभरात सुरु आहे. आज विक्रमगड येथे जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भाजप सरकारला लक्ष केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. २०१४ च्या निवडणुकीतील मोदींची भाषणे ऐकली की गजनी चित्रपटातील अभिनेता आमिर खानच्या भूमिकेची आठवण येते अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदींवर टीका केली.
मोदींच्या भक्तांनी जर मोदींना त्यांचीच २०१४ सालची भाषणे ऐकवली तर मोदी स्वतःच प्रचारासाठी बाहेर पडणार नाही. २०१४ सालच्या लाटेत देशाचे, राज्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र आता यांची वाट लावल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, असेही मुंडे म्हणाले.
रायगड येथून राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात झाली आहे. महाड येथे चवदार तळ्याच्या ठिकाणी पहिली सभा झाली. पहिला टप्पा १० ते १४ जानेवारी असा असून, कोकणातील रायगड-महाड, गुहागर, खेड, कर्जत, नवी मुंबई, ठाणे, विक्रमगड, मुरबाड, उल्हासनगर, भिवंडी ग्रामीण, कल्याण, अंबरनाथ येथे जाहीरसभा होत आहेत. दुसरा टप्पा हा १६ जानेवारीपासून नाशिकपासून सुरू होणार आहे. त्याची माहिती दिली जाईल. तर, तिसरा टप्पा विदर्भात होणार आहे. या संपर्क यात्रेतून केंद्र आणि राज्य सरकारने जनतेला जी आश्वासने दिली होती त्याची आठवण करुन देण्यासाठी आणि जनतेला राजकीय काय परिस्थिती आहे याची माहिती दिली जात आहे.