नवी दिल्ली- इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. मोदींनी पुन्हा पंतप्रधान बनण्याचे समर्थनही केले आहे. सध्याचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी ते फायद्याचे ठरेल असे नारायण मूर्ती म्हणाले. मोदी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोदी कठोर मेहनत घेत आहेत असेही मूर्ती म्हणाले.
पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. मात्र, त्यांनी यावेळी राफेल कराराबाबत बोलणे टाळले. देशाची आर्थिक स्थिती बदलवण्याची इच्छा असलेला एक नेता आपल्याला भेटला आहे. अनुशासन. स्वच्छता आणि आर्थिक विकास यावर जोर देणारा नेता आपल्याला भेटल्याचे गेल्या 5 वर्षांच्या कामकाजावर नजर टाकल्यास लक्षात येते. जर या सरकारला पुन्हा संधी मिळाली तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते फायद्याचे ठरेल, असे मूर्ती म्हणाले.
जीएसटी लागू करण्यामध्ये काही उणीवा दिसत असल्या तरी प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरता येणार नाही असं म्हणत मूर्तींनी जीएसटीच्या मुद्द्यावरुन मोदींचा बचाव केला. आरबीआय आणि केंद्र सरकारमधील वादाबाबत बोलताना मूर्ती म्हणाले की, केंद्र सरकार आणि आरबीआय दोघंही त्यांचं काम करतायेत, त्यांना दोघांनाही आपलं काम काय आहे याबाबतची पूर्ण कल्पना आहे. लवकरच हा वाद संपेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.