काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची खरमरीत टीका
नवी दिल्ली : देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास कमी झाला असून, गुजरात निवडणुकीत राज्यातील जनतेने काँग्रेसला दिलेल्या प्रतिसादामुळे हे आता सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांच्या निकालानंतर पहिल्यांदाच ते पत्रकारांशी बोलत होते. तर पराभवालाच ते विजय मानत असतील तर असला विजय त्यांना लखलाभ असो, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी खा. गांधी यांच्यावर केली. दुसरीकडे, या अटीतटीच्या निवडणुकीत तब्बल 16 जागांवर काँग्रेसचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला असल्याचे उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पक्षांमुळे काँग्रेसची मते विभागली जावून तेथे भाजपचा उमेदवार निवडून आला. हे मतविभाजन झाले नसते तर भाजपला 16 जागांवर नुकसान सोसावे लागले असते, व सत्ता गमवावी लागली असती.
निकाल चांगले, काही बाबतीत कमी पडलो : गांधी
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खा. राहुल गांधी म्हणाले, की गुजरात निवडणुकीत काँग्रेस ही भाजपविरोधात लढू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी संपूर्ण देशातून येत होती. परंतु, अशा स्थितीतदेखील काँग्रेसमधील सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून हे निकाल समोर आणले आहेत. गुजरातच्या जनतेने काँग्रेसला दिलेल्या प्रतिसादावरून मोदींवर जनतेचा असलेला विश्वास आता कमी होत असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही राहुल यावेळी म्हणाले. तसेच गुजरात निवडणुकांचे निकाल हे काँग्रेससाठी अत्यंत चांगले असून, प्रचारादरम्यान काही बाबींमध्ये आम्ही कमी पडलो, अन्यथा गुजरातमध्ये काँग्रेसच विजयी झाली असती, अशी कबुलीदेखील त्यांनी यावेळी दिली. भाजप सरकारने विकासासंबंधी जी काही जाहिरात केली आहे, ती अत्यंत चांगली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र असे काहीच नाही, हे गुजरात निवडणुकीमध्ये आमच्यासमोर आले आहे, असे सांगून त्यामुळेच गुजरातची बहुसंख्य जनता भाजपवर नाराज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
राफेल घोटाळा, जय शहाबाबत मौन
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे नरेंद्र मोदींच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. भाजपवाले मोंदींची मन की बात ऐकतात पण देश ऐकत नाही. राग, पैसा याविरूद्ध तुम्ही प्रेमाने जिंकू शकता हे मला गुजरात निवडणुकीने शिकवले, असेही राहुल म्हणाले. मोदी गजरात निवडणुकीत नोटाबंदी आणि विकासाबाबत काहीच बोलले नाहीत. ते नॉनस्टॉप भ्रष्टाचारावर बोलले पण राफेल घोटाळा आणि जय शहाबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले, असा चिमटाही राहुल यांनी काढला.
गुजरातींचा भाजपला नव्हे काँग्रेसला झटका!
राहुल यांच्या या विधानाचा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, की 2014 पासून राहुल गांधी हे प्रत्येक निवडणुकीत पराभूत होत आले आहेत. आतादेखील गुजरात निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसचा पराभव झालेला आहे. तरीदेखील हा पराभव हाच विजय असल्याचे ते म्हणत असतील तर त्यांना हा विजय लखलाभ असो. जनता त्यांना वारंवार झटके देत आहे आणि ते म्हणत आहेत की पंतप्रधान मोदींची विश्वार्हता कमी होत आहे. गुजरातमध्ये भाजप सहाव्यांदा सरकार स्थापन करत असून, हिमाचल प्रदेशात भाजपला दोन तृतीयांश बहुमत प्राप्त झालेले आहे. तरीही राहुल हे भाजपला झटका बसल्याचे सांगत असतील तर त्यांच्याबद्दल आता काय बोलायला हवे, असा सवालही जावडेकर यांनी केला.