मोदींवरील व्यंगचित्राने राज ठाकरे नेटिझन्सकडून ट्रोल

0

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्यंगचित्र नेहमीच चर्चेत असतात. राजकीय तसेच सामाजिक विषयावर भाष्य करणारे त्यांचे व्यंगचित्र असतात. त्यांच्या व्यंगचित्राची नेहमी वाहवाह केली जात असते मात्र काल पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील व्यंगचित्रानंतर राज ठाकरे ट्रोल होताना दिसत आहेत. त्यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यंगचित्राच्या माध्यमातून दिल्या. त्यांच्या या व्यंगचित्रावरून किमान पंतप्रधानांना वाढदिवशी तरी असा विरोध करायची गरज नव्हती असा एकूण सूर उमटत आहे.

आपला ६८ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक अशा शब्दांत टोला लगावला आहे. यासाठी त्यांनी राज्य सरकारने नुकताच काढलेल्या आदेशाचा दाखला दिला आहे. सर्व शाळांमध्ये मुलांना नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित ”चलो जीते है” हा लघुपट दाखवण्याची सक्ती केली आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा दाखला देत राज ठाकरे यांनी मोदींना ओरखडे ओढले आहेत.

राज ठाकरे यांनी गणपतीच्या रूपात मोदींना दाखवले असून खाली उंदीर म्हणून अमित शाह दिसतात. राज यांच्या व्यंगचित्राला त्यांच्या फेसबुक पेजवर हजारो रिअॅक्शन्स मिळाल्या असून हजारांपेक्षा जास्त जणांनी ते शेअर केले आहे, तर पाचशेपेक्षा जास्त जणांनी कमेंट केल्या आहेत. कमेंट करणाऱ्यांमध्ये विरोधकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. सदर व्यंगचित्र म्हणजे मूर्खपणाचा कळस, वैचारिक पातळीचं अध:पतन इथपासून ते मोदींचं कार्टून काढण्याशिवाय काहीच नाही अशा प्रकारच्या कमेंट्स करण्यात आल्या आहेत. ट्विटरवरही हे व्यंगचित्र व्हायरल झाले असून तिथंही राज यांच्यावर टिका करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.

नाही म्हणायला काही समर्थकांनी या व्यंगचित्राचं कौतुक केलं आहे, परंतु एकूण कल विरोधाचाच आहे. काही जणांनी तर व्यंगचित्रामध्ये हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या गणपतीचा उपयोग करायची काय गरज होती असा प्रश्न विचारला आहे.

निलेश राणे यांनीही श्रद्धास्थानाला धक्का लागल्याचा दावा करत राज ठाकरे यांच्या या व्यंगचित्रावर टिका केली आहे. गणपती आमचं श्रद्धास्थान असून कुणी ते व्यंग म्हणून वापरलं तर ते चुकीचं असल्याचे राणे म्हणाले आहेत. राजकारण आपल्या जागी असावं, देवदेवतांना त्यात वापरू नये असंही त्यांनी म्हटलं आहे.