मोदींवर खालच्या शब्दात टीका केल्याने राहुल गांधींविरोधात भाजप नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट !

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधानांवर टीका करताना खालच्या शब्दाचा वापर करुन मर्यादा ओलांडली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे ‘गाली गॅंग’ चे प्रमुख आहेत अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी भाजपाच्या शिष्टमंडळासह केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्तार अब्बास नकवी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्याचसोबत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाला केल्याचं मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले.

भाजपा नेत्या निर्मला सीतारामन आणि मुख्तार अब्बास नकवी यांनी राहुल गांधींवर टीका केली. सुप्रीम कोर्टाच्या नावावर वारंवार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी खोटे बोलत आहे. काँग्रेसमध्ये झूठमेव जयतेच्या आधारावर कोणताही पुरावा नसताना राफेल प्रकरणात खोटे आरोप लावत आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर लक्ष ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.