नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे जनतेचे सर्वात मोठे विश्वासप्राप्त सरकार असल्याचे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट (ओईसीडी)च्या ताज्या अहवालात नमूद आहे. या अहवालानुसार, भारताचे 73 टक्के नागरिक मोदी सरकारवर पूर्णपणे विश्वास ठेवतात. त्यामुळे जनतेचा विश्वासप्राप्त सरकारच्या यादीत मोदी सरकार जगात अव्वल ठरलेले आहे. त्या खालोखाल पंतप्रधान जस्टीन ट्रयूडो यांच्या नेतृत्वातील कॅनडा सरकार 62 टक्के व अध्यक्ष रेचप तैयप अर्दोआन यांच्या नेतृत्वातील तुर्की सरकार 58 टक्के यांचा समावेश होतो. जगभरातील राष्ट्रप्रमुखांना त्यांच्या देशातील आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय परिस्थितीबाबत अवगत करणार्या या संस्थेने मोदी हे जगातील विश्वासप्राप्त नेतृत्व असल्याचाही गौरव केला आहे.
कठोर निर्णय घेऊनही मोदींवर सर्वाधिक विश्वास
वर्ष 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक जनादेश प्राप्त झाला होता. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात ठोस आर्थिक निर्णय लागू केले होते. अप्रत्यक्ष कर रद्द करत त्यांनी वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करण्याचाही महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच, काळापैसा व भ्रष्टाचार रोखण्यासाठी नोटाबंदीचाही ऐतिहासिक निर्णय घेतला होता. आर्थिक, राजकीय, परराष्ट्र धोरण, सामाजिक निर्णयांत कठोर भूमिका घेऊनही भारतातील 73 टक्के लोकांचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे जागतिक पाहणी अहवालात ओईसीडीने नमूद केले आहे. मोदी सरकारवर दर्शविण्यात आलेल्या विश्वासाचे हे प्रमाण जगातील कोणत्याही सरकारवर दाखविण्यात आलेल्या विश्वासामध्ये सर्वोच्च आहे. मोदीनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रयूडो यांनी क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या सरकारवर 63 टक्के नागरिकांचा विश्वास आहे. तर तुर्कस्थानचे अध्यक्ष रेचप तैयप अर्दोआन यांनी मात्र आश्चर्यकारकरित्या तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. त्यांच्याविरोधात गेल्याचवर्षी लष्करी बंड झाले होते व ते फसले होते. या तीन देशानंतर रशिया 58 व जर्मनी 55 टक्के या राष्ट्रांच्या प्रमुखांचा समावेश होतो.
ग्रीस जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला
अहवालानुसार, युरोपियन युनियनमधून बाहेर पडत असलेल्या युनायटेड किंगडम (ब्रिटन)मधील 41 टक्केच लोकांचा पंतप्रधान थेरेसा मे यांच्या सरकारवर विश्वास आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वावर केवळ 30 टक्के लोकांचाच विश्वास आहे. युरोपमध्ये पसरलेल्या स्थलांतर संकट आणि धोक्यात आलेली अर्थव्यवस्था पाहाता, युनान (ग्रीस)ला या यादीत तळाचे स्थान मिळालेले आहे. ग्रीसमधील सरकारला अवघ्या 13 टक्के नागरिकांची पसंती आहे. या जनतेचा आपल्या सरकारवरील विश्वास उडाला असल्याची ही आकडेवारी द्योतक आहे. मोदी सरकारवर असलेला जनतेचा सर्वोच्च विश्वास ही मात्र केंद्र सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी आहे.