मोदींसाठी युतीचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील ः गिरीश बापट

0

पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदार संघातील भाजप-शिवसेना पदाधिकार्‍यांची मंगळवारी आकुर्डीत बैठक

पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील पाचवर्षात देशात अनेक लोकाभिमुख विकासकामे झाली आहेत. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच दैदिप्यमान कामे झाली आहेत. पाच वर्षाचे काम बघून जनता मोदी यांना साथ देणार आहे. त्यासाठी भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवावीत. पुणे जिल्ह्यातील आपले चारही उमेदवार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी युतीचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील अशा विश्‍वास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना-भाजपमधील कटुता संपली असून कार्यकर्ते विचाराला बांधील आहेत. शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, स्वार्थ, परमार्थ कोणीही येऊ देत. आपल्याला काहीच फरक पडत नाही. गेल्यावेळी पेक्षा यावेळी जास्त मताधिक्याने युतीचा खासदार निवडून येईल, असेही ते म्हणाले. पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदार संघातील भाजप-शिवसेना पदाधिकार्‍यांची मंगळवारी आकुर्डीत बैठक झाली. त्यावेळी बापट बोलत होते.

दोन भाऊ एकत्र आल्याने आनंद…
यावेळी शिवसेना उपनेत्या नीलम गोर्‍हे, महापौर राहुल जाधव, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष, आमदार बाळा भेगडे, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यासह भाजप – सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना-भाजपचे भांडण नव्हते. दोन्ही पक्षांनी ताकद वाढविली. त्यात काहीही गैर नाही असे सांगत बापट म्हणाले, खुप दिवसांनी दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद होत आहे. युती झाल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे. मतभेद संपले आहेत. भविष्यात एक कुटुंब म्हणून कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते विचाराला बांधील आहेत. आता सर्वांनी एकदिलाने, एका मनाने कामाला लागायचे आहे. सरकारचे प्रत्येक योजना, काम घेऊन नागरिकांपर्यंत पोहचायचे आहे.

पुणे जिल्ह्यात 60 हजार कोटींची कामे….
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशाला स्थिर, काम करणारे सरकार द्यायचे आहे. काँग्रेसने 70 वर्षात काहीच केले नाही. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने आणि महाराष्ट्रातील युती सरकारने तेवढी विकास कामे केली आहेत. फक्त पुणे जिल्ह्यात 60 हजार कोटी रुपयांची विकास कामे चालू आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही ओरडू द्या. आपल्याला फरक पडणार नाही, असे बापट म्हणाले.

निरोधकांना चारीमुंड्या चीत करणार…
भाजप-शिवसेना पैशावर, जातीवर, धर्मावर निवडणूक लढवित नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढविते. युतीचा आत्मा कार्यकर्ता आहे. आपले कार्यकर्ते तळमळीचे आहेत. विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्याशिवास स्वस्थ बसणार नाहीत. शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, स्वार्थ, परमार्थ कोणीही येऊ देत. आपल्याला काहीच फरक पडत नाही. निवडणूक आपण जिंकणार आहोत. पण गाफील राहयाचे नाही. सहज घ्यायचे नाही. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचायचे आहे. उमेदवार कोण आहे, हे पाहू नका, युतीचा उमेदवार आहे, हे पाहून काम करा असेही बापट म्हणाले.