मुंबई (प्रतिनिधी) – पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 11 हजार 400 कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेला हिरेव्यापारी नीरव मोदीवर सीबाीआय आणि ईडीची कारवाई सलग आठव्यादिवशीही सुरू होती. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरूवारी नीरव मोदीच्या आणखी काही मालमत्ता आणि कंपन्यांवर छापे टाकले. यावेळी मोदीच्या 9 अलिशान गाड्या जप्त केल्या. तसेच, 9 लक्झरी कारसह 7.80 कोटींचे म्युच्युअल फंड आणि शेअरही जप्त करण्यात आले. दुसरीकडे, मेहुल चौकसीच्या गीतांजली ग्रुपच्या 86.72 कोटींचे म्युच्युअल फंड आणि शेअरही ताब्यात घेतले. तर ईडीने गिली इंडिया कंपनीचे डायरेक्टर अनियथ शिवरामनयांचे मुंबईतील घर सील केले आहे. बुधवारी सीबीआयनेही मोदीच्या अलिबागमधील आलिशान फार्म हाऊसला सील ठोकले होते.
रोल्स रॉयसची किंमत 6 कोटी
गुरूवारी ईडीने जप्त केलेल्या गाड्यांमध्ये एक रोल्स रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज बेंझ जीएल 350 सीडीआयएस, एक पोर्शे पनामेरा, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्युनर आणि एका टोयोटा इनोव्हा गाडीचा समावेश आहे. जप्त केलेल्या नऊ कारची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यातील रोल्स रॉयस कारची किंमत सुमारे 6 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच ईडीने नीरव मोदीचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवले आहेत. या शेअर्सची किंमत साधारण 7.80 कोटी रूपयांच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले. घोटाळ्यातील दुसरा आरोपी आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या संपत्तीवरही ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने मेहुल चोक्सीच्या ग्रुपशी संबंधित 86.72 कोटींचे शेअर्स आणि म्युच्युअल फंडसही गोठवले आहेत.
5649 कोटींचे दागिने जप्त
ईडीची कारवाई प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉण्डरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत सुरू आहे. हे गुन्हेगारी प्रकरण आहे. आरोपीने चुकीच्या पद्धतीने पैसा किंवा संपत्ती जमवली असेल तर ती जप्त केली जाऊ शकते. पण जोवर खटल्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत त्याची विक्री किंवा लिलाव करता येणार नाही. जप्त केलेले हिरे आणि दागिने यावर एखादा सप्लायर पुराव्यांच्या आधारे दावा करत असेल तर आणि त्याने नीरव मोदीला हे दागिने विक्रीसाठी दिले होते, असे म्हणत असेल तर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होईल. त्या व्यक्तीचा दावा खरा ठरला तर त्याला हे दागिने द्यावे लागू शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले. पंजाबच्या नॅशनल बँक (पीएनबी) ला 11,356 कोटींचा चुना लावणार्या नीरवच्या विविध शॉप आणि इतर ठिकाणांहून ईडीने 5649 कोटींचे दागिने जप्त केले आहेत.