मोदीविरोधात इंटरपोल काढणार रेड कॉर्नर नोटीस

0

भारतीय तपास यंत्रणांना विचारले प्रश्‍न

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची 13 हजार 400 कोटींची फसवणूक करून परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची भारतीय तपास यंत्रणा वाट पाहत आहेत. इंटरपोल लवकरच नीरव मोदीविरूद्ध ही नोटीस काढण्याची शक्यता असली तरी इंटरपोलने भारतीय तपास यंत्रणांना मोदीला रेड कॉर्नर नोटीस बजावण्यापूर्वी एक प्रश्‍नावली पाठवली असून, त्यात 8 प्रश्‍न विचारले आहेत.

एसएफआयओ देणार उत्तर
फ्रान्समधील ल्योन येथे असलेल्या इंटरपोलच्या मुख्यालयाकडून त्यांच्या भारतातील दिल्लीच्या कार्यालयाकडे ही प्रश्‍नावली पाठवण्यात आली आहे. याद्वारे त्यांनी नीरव मोदीबाबत काही महत्वाची माहिती विचारली आहे. या प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे देण्यात जर भारतीय तपास यंत्रणा कुचकामी ठरल्या तर नीरव मोदींविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यास अवघड होऊ शकते. इंटरपोलच्या दिल्लीतील नॅशनल सेन्ट्रल ब्युरोने ही प्रश्‍नावली सीबीआय, ईडी आणि फ्रॉड इव्हेस्टिगेशन ऑफिसकडे (एसएफआयओ) पाठवली असून, या भारतीय तपास यंत्रणा या प्रश्‍नांना योग्य प्रतिसाद देण्यासाठी रात्रीपासून कामाला लागल्या आहेत.

त्या ठराविक देशाची माहिती
बँकिंग घोटाळ्यात नीरव मोदीचा वैयक्तिक सहभाग असल्याबाबत स्पष्टीकरण द्या, नीरव मोदीवर कुठल्या आरोपांखाली कुठले गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांची व्याख्या काय आणि तो त्यात दोषी कसा आहे? नीरव मोदी विरोधात कुठले पकड वॉरंट काढण्यात आले आहे त्याची सविस्तर महिती द्या. तसेच तो कुठल्या देशात असल्याचा तुम्हाला संशय आहे त्या ठराविक देशाची माहिती द्या. नीरव मोदीच्या केस संदर्भातील कागदपत्रांचे अरेबिक, इंग्रजी, फ्रेन्च आणि स्पॅनिश या चार भाषांमध्ये भाषांतर करुन द्या, अशा स्वरुपाचे प्रश्‍न या प्रश्‍नावलीत विचारण्यात आले आहेत.