मोदीविरोधी सूर काँग्रेसच्या पथ्यावरच!

0

पुणे (राजेंद्र पंढरपुरे) । भारतीय जनता पक्षातही मोदीविरोधी सूर लावलेले माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, खासदार नाना पटोले यांच्या भाषणाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली, काँग्रेसचे स्थानिक नेते गट-तट विसरून उपस्थित राहिले. पुण्यातील या कार्यक्रमाचे पडसाद उमटणार होते तसे घडलेही. भाजपतूनही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांना काँग्रेस पक्षाने लक्ष्य बनविले आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयाचे परिणाम जाणवू लागले आहेत, त्यातून निर्माण झालेला असंतोष संघटीत करण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे.

खुद्द भाजपमध्ये मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर नाराजीचा सूर सिन्हा यांनी लावला आणि त्याच दरम्यान पटोले यांनी शेतकरी प्रश्‍नावरून भाजपला घेरले आहे. काँग्रेससाठी हे अनुकूलच घडत गेले. सिन्हा आणि पटोले यांना काँग्रेस पक्षाकडून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष साथ मिळत गेली आहे आणि ते दोघेही ती घेत आहेत.काँग्रेसजनांनी गुजरातच्या निवडणूक रणधुमाळीत सिन्हा यांना पाचारण केले होते.पुण्यातही तेच घडले.वसंतदादा सेवा संस्था या संस्थेने सिन्हा आणि पटोले यांचे भाषण आयोजित केले होते.काँग्रेसचे नेते संजय बालगुडे या संस्थेचे अध्यक्ष आहेत,त्या संस्थेच्या व्यासपीठावर झालेला कार्यक्रम हा एकप्रकारे काँग्रेसला पूरकच ठरणारा म्हणता येईल.त्यामुळे असेल पण काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी आदी पदाधिकारी आवर्जून आले होते. काँग्रेससाठी हा कार्यक्रम किती महत्वाचा होता हे यातून सूचित होते.

अपेक्षेप्रमाणे भाजपतून प्रतिक्रिया उमटली आहे.मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था सक्षम करणारे निर्णय घेतले. मुदीजचा सकारात्मक अहवाल हे त्याचेच द्योतक आहे.मोदी यांच्या धाडसी आर्थिक निर्णयांवर काही विशिष्ट भूमिका असल्यास सिन्हांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अजूनही आपले मत पक्षीय पातळीवर मांडल्यास त्याचा निश्‍चितच सकारात्मक विचार केला जाईल असा कार्यकर्ता म्हणून मला विश्‍वास आहे. पटोले हे देखील माझे चांगले मित्र असून त्यांनी देखील पक्षाकडे आपली भूमिका मांडावी,असे आवाहन खा.अनिल शिरोळे यांनी केले.

सध्या मुडीज या वित्तीय संस्थेच्या अहवालानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे, मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिर्घकालीन हिताची असल्याचा दावा भाजप या अहवालाच्या आधारे करीत आहेत. सिन्हा यांनी भाषणात दावा कुचकामी असल्याचे दाखवून दिले. भविष्यात इंधनाच्या किमती वाढल्यास देशाची अर्थव्यवस्था ढासळत जाईल, इतकी आपली व्यवस्था नाजूक आहे, असे सिन्हा यांनी सांगितले.जीएसटी अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाली,त्यात सुधारणा करण्यासाठी समिती नेमावी असेही त्यांनी सुचविले.पटोले यांनी रा.स्व.संघ मुद्दा घेतला.हिंदू दहशतवाद प्रकरणात सरसंघचालक भागवत यांना गोवण्याचा प्रयत्न झाला,असा प्रयत्न करणार्यांना नितीन गडकरी,देवेंद्र फडणवीस मदत कसे करतात असा प्रश्‍न पटोले यांनी केला.त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसवर होता.पुण्यात हा मुद्दा मांडून पटोले यांनी गडकरी यांना चर्चेत आणले आहे.