नवी दिल्ली : सहा दिवसांच्या भारत दौर्यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी नऊ करारांवर स्वाक्षर्या केल्या. सायबर सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमधील करारांचा यात समावेश आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदी हे क्रांतिकारी नेते असून त्यांनी भारतात क्रांती घडवली, असे म्हणत नेतान्याहू यांनी मोदींचे कौतुक केले. इस्त्रायललाही दहशतवादाची झळ बसत असून भाविष्यात दोन्ही देश एकत्र येऊन दहशतवादाचा सामना करतील. आम्ही दहशवादाविरोधात भारतासोबत आहोत, अशी ग्वाही नेतान्याहू यांनी यावेळी दिली.
भारतात लोकशाही, धर्मनिपक्षतेचे दर्शन : नेतान्याहू
आपल्या भाषणात नेतान्याहू म्हणाले, मोदी हे क्रांतिकारी नेते असून त्यांनी माझे ज्या पद्धतीने स्वागत केले त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. भारतीय जवानांनी इस्रायलसाठी बलिदान दिले. मोदी हे इस्रायलमध्ये येणारे पहिले पंतप्रधान असून त्यांचा इस्रायल दौरा एखाद्या रॉक कॉन्सर्टपेक्षा कमी नव्हता. भारतातही ज्यू आहेत. ज्यू लोकांना भारतात नेहमीच प्रेम आणि आदर मिळाला, यातून भारताच्या लोकशाहीचे आणि धर्मनिपक्षतेचे दर्शन घडते. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश दहशतवादाने पीडित आहेत. दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. इस्त्रायलने कृषी तंत्रज्ञानात कमी वेळात मोठी प्रगीत केली असून भारताकडेही अशी क्षमता आहे. कमी पाण्यात जास्त पिक घेण्याचे तंत्रज्ञात आम्ही विकसीत केले आहे, असे नेत्यानाहू म्हणाले. दोन्ही देशांमध्ये झालेल्या महत्वपूर्ण करारांमुळे भविष्यात भारतातील शेतकर्यांना इस्त्रायली कृषी तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकणार आहे.
दोन्ही देशांनी एकमेकांना साथ देण्याची गरज : मोदी
परिषदेच्या सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिब्रू भाषेतून नेत्यानाहू यांचे स्वागत केले. दोन्ही देशांमध्ये चित्रपट, स्टार्ट अप इंडिया, संरक्षण आणि गुंतवणुकीबाबत सहमती झाली. आगामी काळात दोन्ही देश एकमेकांच्या विकासासाठी आणि जनतेसाठी एकत्र येऊन काम करतील, अशी मी आशा करतो. देशात सध्या सणासुदीचा काळ सुरु असून अशा वेळी नेतान्याहू भारतात आल्याने त्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडेल, असे मोदी म्हणाले. गेल्या 25 वर्षांपासून भारत आणि इस्रायलमधील संबंधांमध्ये सुधारणा होत आहे. इस्रायलमधील अनेक कंपन्यांना मी भारतात शस्त्रास्त्र निर्मिती करण्याची विनंती मी केली आहे. क्षेत्रीय समस्यांचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांना साथ देण्याची गरज आहे, असे मोदींनी म्हटले.