नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिका दौ-यात 25 किंवा 26 जूनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौ-याच्या तारखा आज जाहीर होऊ शकतात. ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. आतापर्यंत तीन वेळा दोन्ही नेत्यांनी फोनवरुन चर्चा केली आहे. दहशतवादाच्या मुद्यावर ट्रम्प यांनी भारताला अनुकूल भूमिका घेतली असली तरी, पॅरिस हवामान करारातून माघार घेताना त्यांनी भारतावर कडाडून टीका केली होती. त्यामुळे मोदी यांच्या अमेरिका दौ-याबद्दल सांशकता निर्माण झाली होती. पण सरकारने मोदी अमेरिका दौ-यावर जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. पॅरिस हवामान करारातून भारत आणि चीनला अब्जाववधी डॉलर्स मिळणार आहेत असे भारताला दुखावणारे विधान त्यांनी केले होते. अमेरिकेने अशी तडकाफडकी माघार घेतल्यानंतरही मोदींनी पॅरिस हवामान करारातील नियम आणि अटींचे पालन करणार असल्याचे म्हटले होते.