पीएनबीचा माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीची कबुली
मुंबई : नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही लेटर ऑफ अंडरटेकिंगसाठी (एलओयू) मला ब्लॅकमेल करायचे अशी कबुली पंजाब नॅशनल बँकेचा माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याने दिली आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी गोकुळनाथ शेट्टीला इडीने अटक केली असून, त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीत त्याने हा खळबळजनक खुलासा केला आहे. 13 हजार 700 कोटी बुडवून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनीही देशाबाहेर पलायन केले आहे. या प्रकरणात काही बँक अधिकार्यांनाही यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यापैकीच एक गोकुळनाथ शेट्टी आहे.
माझे वरिष्ठच या घोटाळ्यात
पंजाब नॅशनल बँकेचा माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीने चौकशीत सांगितले की, पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेचा जनरल मॅनेजर राजेश जिंदाल याने 2009 ते 2011 या त्याच्या कार्यकाळात घोटाळा करण्यास हातभार लावला. मी तर या घोटाळ्याच्या साखळीची छोटीशी कडी होतो. मुख्य सूत्रधार राजेश जिंदाल होता. त्याने डोळे झाकून एलओयू पास केले. भ्रष्टाचार करण्यासाठी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला राजेश जिंदालने मदत केली. कोणत्याही प्रकारची सुरक्षा ठेव न घेता नीरव मोदीला एलओयू देण्यात आले, असेही शेट्टीने चौकशीत सांगितले. मला या दोघांची दहशत वाटत होती आणि ते दोघेही मला ब्लॅकमेल करत होते, त्यामुळे मी खूप तणावाखाली आलो होतो. माझी नोकरी जाईल या भीतीने मी त्यांना मदत केली. माझे वरिष्ठच या घोटाळ्यात सहभागी होते त्यामुळे मी या घोटाळ्याचा एक भाग झालो, अशी कबुली शेट्टीने दिली आहे.
न्यायालयीन कोठडीची शक्यता
गोकुळनाथ शेट्टीची इडी कस्टडी बुधवारी संपते आहे. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत होण्याची शक्यता आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेतून शेट्टी याने 2009 ते 2011 या कालावधीत नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनाही एलओयू उपलब्ध करून दिले होते असा आरोप आहे. दरम्यान, राजेश जिंदाललाही 21 फेब्रुवारी रोजी सीबीआयने अटक केली आहे. 2009 ते 2011 या कालावधीत राजेश जिंदाल पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेचा प्रतिनिधी होता. त्याच्या कारकिर्दीतच नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांना एलओयूज देण्यात आले.