भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहे. मतदानाला अवघा आठवडा शिल्लक राहिला आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला आहे. नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने पाकिस्तानशी हातमिळवणी केली असल्याचा गंभीर आरोप उमा भारती यांनी केला आहे.
दमोह निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी उमा भारती यांनी काँग्रेसशिवाय समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही हल्लाबोल केला. अखिलेश हे आपल्या पित्याच्या कमाईवर जगत आहेत. सर्वाधिक भेदभावाचे राजकारण अखिलेश करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दमोह मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले धर्मेंद्र लोधी यांच्या प्रचारासाठी उमा भारती तिथे आल्या होत्या. त्याच्या एक दिवस आधी अखिलेश यादव दमोह येथे प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांनी भाजपा सर्वाधिक भेदभाव करणारा पक्ष असल्याची टीका केली होती. ते ताजमहलमध्ये पूजा करून घेतात आणि शहरांची नावे बदण्याचे काम करतात, असे म्हटले होते. दुसरीकडे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना समोरासमोर येण्याचा आव्हान दिले आहे.