मोदी पुन्हा दोन कोटी रोजगाराचे आश्वासन देतील-राहुल गांधी

0

भोपाळ- मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधान सभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगड दौऱ्यावर आहेत तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्य प्रदेश दौऱ्यावर. दोघांनी आज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप किल. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिल्याची आठवण करुन दिली. चीन सरकार 24 तासात 50 हजार तरुणांना रोजगार देत आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियासारख्या मोहिमेतून मोदी सरकार 24 तासात फक्त 450 जणांना रोजगार देण्यात यशस्वी होत आहे असे राहुल गांधींनी सांगितले आहे.

नरेंद्र मोदी येतात आणि 15 लाखाचे आश्वासन देतात. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देतील. पण आपल्या भाषणात गेल्या साडेचार वर्षात किती तरुणांना रोजगार दिला यासंबंधी एकही शब्द उच्चारणार नाहीत. मध्य प्रदेश आणि केंद्र सरकारने किती जणांना रोजगार दिला आहे? असा प्रश्न विचारत राहुल गांधींनी टीका केली आहे.

नरेंद्र मोदींनी गेल्या साडेचार वर्षात देशातील श्रीमंतांचे तीन लाख 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मनरेगा चालवण्यासाठी 33 हजार कोटी रुपये लागतात, पण मोदींनी त्याच्या 10 टक्के पैसे आपल्या निवडक व्यावसायिकांना दिले आहेत.

‘मी मोदींच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला की, मला सांगा तुम्ही 15-20 लोकांचे तीन लाख कोटी रुपये माफ केलेत. तुम्ही शेतकऱ्यांचा बोनस हिसकावून घेता. त्यांना योग्य मूल्य देण्याचे आश्वासन दिले, पण देत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ का करत नाही,यावर ते काहीच बोलले नाहीत, असे राहुल गांधींनी सांगितले.

यावेळी राहुल गांधींनी मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले तर 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, 11 वा दिवस लागणारच नाही अस आश्वासन दिले. ‘नरेंद्र मोदी भ्रष्टाचारावर बोलायचे. पण आजकाल त्यांच्या भाषणात भ्रष्टाचाराचा उल्लेख नसतो. नोटाबंदीपेक्षा मोठा घोटाळा आपल्या देशात झालेला नाही. येणाऱ्या काळात हे सिद्ध होईल. मोदींनी गरिबांच्या खिशातून पैसा काढून तोच पैसा श्रीमंतांच्या खिशात टाकला आहे’, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.