भाजपा खासदार नाना पटोले यांचा घरचा आहेर
अकोला : मी शेतकर्यांचे, शेतमजूरांचे, मच्छिमारांचे प्रश्न मांडतोय यास कुणी बंड म्हणत असेल तर ते मला मान्य आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर मी टीका केली त्यांच्या दुसर्याच दिवशी माझा छगन भुजबळ केला असता याची मला जाणीव आहे. मात्र माझे घरच काचेचे नसल्याने मला कुठलीही भीती नाही, असे रोखठोक मत भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केल्याने भाजपाची गोची झाली आहे. पटोले एवढ्यावरच न थांबता म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्हीजन नाही. असा नेता राज्याला लाभला हे लाजिरवाणे आहे.
अशा सत्तेला अर्थ काय?
पटोले म्हणाले की, मी मोदी लाटेत निवडून आलो नाही. मी धनशक्तीला विरोध करून निवडून आलो आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण होत नाही. मी जनतेचे प्रश्न जाणतो आणि ते मांडण्यांचा, त्यावर चर्चा घडवून आणण्याचा मला अधिकारच नसेल तर अशा सत्तेला अर्थ काय?. मला पक्षातून काढून टाकले तर मी खासदारकीही सोडून देईन. सत्ताधारी पक्षाचा खासदार असताना संसदेत मत मांडण्याचा अधिकार नसेल, तर मी खुर्चीला चिकटून राहणारा नेता नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मी फिरतोय, शेतकर्यांची लूट आणि त्यांच्यावर कसा अन्याय होत आहे हे मी पाहतोय. या विषयी मी बोलणारच आणि बोलत राहीन.
मुख्यमंत्र्यांना व्हिजन नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्हिजन काय आहे, हे मला माहित आहेत. फडणवीस यांच्यासारखा माणूस राज्याचा नेता आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात यापेक्षा लाजीरवाणी बाब ती काय असू शकते. छत्रपतींचा राज्यभिषेकही केला नाही, अन् तुम्ही त्यांचेच नाव घेता आणि सत्तेतही तुम्हीच, अशी तोफ खासदार नाना पटोले यांनी डागली.
पवारांचे राजकारण सेटलमेंटचे
शेतकर्यांचे सरकार आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ते आगामी काळात येणारच, असे सांगत पटोले यांनी त्यांची पुढील वाटचाल शिवसेनेच्या दिशेने असल्याचे संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना शेतीचा चांगला अभ्यास आहे. असे असतानाही ते सध्या सेटलमेंटचे राजकारण करीत आहे. त्यांचे राजकारण न समजण्याइतपत जनता दुधखुळी नाही. तर शिवसेना महागाईवर आंदोलन करीत आहे. पण तत्पूर्वी त्यांनी सरकारमधून बाहेर पडल्यास विरोध आणखी प्रखरपणे करता येईल.