नाशिक : ‘मोदी बोलायला गडी हुशार…शरद पवारांनी बोट धरून मला राजकारणात आणलं, असे पुण्याच्या कार्यक्रमात ते म्हणाले आणि…हे ऐकून मी मेलोच ना..,’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर चौफेर टीका केली. नाशिकमधील पिंपळगावच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
सरकारची पुढची पायरी सोनं आहे. आमच्या प्रत्येक आई-बहिणीच्या गळ्यात किती सोनं आहे, याची चौकशी करणार आहेत. म्हणजे आम्ही लोकसभेचे अखेरचे सभादच ठरलो म्हणायचे. पुन्हा कधी संसदेत लोक आम्हाला पाठवणार नाहीत. आमचीच आता ही दैना झाली म्हणजे काय करायच? कुणी बोलयचं? भाजपचे खासदार मोदींना खूप घाबरतात. पंतप्रधान मोदींना जरा समजवा, अशी विनंती भाजपचे खासदार माझ्याकडे करतात, असे शरद पवार म्हणाले.
मोदी असं जोरात भाषण करतात की, समोरच्या माणसाला वाटतं की नक्कीच 56 इंचाची छाती आहे. मला 50 दिवसांची मुदत द्या, त्यानंतर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगेन…असे ते नोटाबंदीबाबत म्हणाले होते. याबाबत शिवसेनेचेच त्यांचे सहकारी टीका करत आहेत. नोटाबंदीला पन्नास दिवस पूर्ण झले आता कोणत्या चौकात उभं करायचं यांना ? कसला असूड वापरायचा? म्हटलं, बाबा तुम्ही सगळे गळ्यात गळे घालणारे लोक…तुम्हीच ठरवा काय घ्यायचं ते, असाही पवार यांनी नोटाबंदीचा समाचार घेतला.
माझी ही आवस्था तर…
माझी दोन एकरांवरील वांगी मातीमोल झाली. बाजारात नेण्यापेक्षा त्यावर ट्रॅक्टर घातला. कांदा, टोमॅटोसह सर्वच शेतमालाचे भाव घसरले. माझ्या सारख्याची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य शेतकर्यांची काय अवस्था असेल. न्यायालयाच्या आदेशानंतरही सहकारी बँकेत जमा झालेले 8 हजार 600 कोटी कोणीही स्विकारत नाही, असेही पवारांनी म्हटले.
अण्णा हजारेंना कोर्टात खेचणार
अण्णा हजारे म्हणतात मी साखर कारखानदारी बंद पाडली आहे. इथला निफाडचा कारखाना बंद झाला आहे. माझा या कारखान्यांशी संबंध नाही, मग कारखाना बंद कसा पडला? अण्णांचा समाचार मी कायदेशीररित्या घेईलच. पण साखर कारखानदारी बंद का पडत आहे, याचा विचारही करण्याची आज खरी गरज आहे, असे पवार म्हणाले.
ही नोटाबंदी की नसबंदी?
नोटाबंदी संदर्भात आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. लोक सध्या गप्प आहेत म्हणजे ते वेडे नाहीत. आणीबाणीच्या वेळेला जनता अशीच गप्प होती आणि निवडणूकीत त्यांनी काँग्रेसचा पराभव केला होता. आज घेतलेला हा निर्णय नोटबंदीचा आहे की नसबंदीचा हे मतदानाला गेल्यावरच लोक ठरवतील, अशी टीका नोटाबंदीबाबत पवार यांनी केली.
कॅशलेस सोसायटी हे दिवास्वप्न
कॅशलेस सोसायटी जगातील इतर देशात आहे, पण तिथपर्यंत पोहोचायची अजून आपली तयारी झालेली नाही. अमेरिकेतही 30-35 टक्के, इंग्लंडमध्ये 40 टक्के, आखाती देशांमध्ये 50 टक्के लोक, भारतात 80 टक्के लोक डेबिट, क्रेडिट कार्ड वापरत नाहीत. त्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणे खडतर आहे, असे पवार म्हणाले.
आमच्या शहाण्याने नोटांचा कारखाना टाकला
बनावट नोटा छापल्याने सध्या तुरुंगात असलेला नाशिक येथील राष्ट्रवादीचा पदाधिकारी छबू नागरेवर देखील शरद पवारांनी सडेतोड भाष्य केले. ‘आमच्यातील एका शहाण्याने घरातच नोटा छापण्याचा कारखाना टाकला. अशा बनावट नोटा छापणार्यांना फासावर लटकवा,’ असे शरद पवार यांनी म्हटले.