मुंबई:- भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि देशातील विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
यावरून पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला आहे. संकट कितीही मोठे असले तरी भारताचे संस्कार हे निःस्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रेरणा देतात असे मोदी सांगतात. तेव्हा त्यांच्या भक्तांनी विरोधकांकडे डोळे वटारून पाहण्याची गरज नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून भाजपाला टोला लगावण्यात आला आहे. मोदी चीनविषयी बोलतात व त्यांचे लोक विरोधकांकडे वाकड्या नजरेने पाहतात. कुछ तो गडबड है! कोरोनाप्रमाणे ‘ट्यून’ येथेही बदलायलाच हवी, असा निशाणा शिवसेनेने लगावला आहे.
‘कोरोना व्हायरसशी आज संपूर्ण देश लढत आहे. पण लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही!’ जसा या ट्यूनचा लोकांना कंटाळा आला. तसाच चीनप्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या ट्यून युद्धाचाही कंटाळा आला आहे. ‘आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही’ अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी, असे शिवसेनेने म्हटले आहे.