नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या महालाटेवर स्वार होऊन भारतीय जनता पक्षाने मिनी लोकसभा म्हणून ओळखल्या जाणार्या उत्तरप्रदेशात विराट विजय प्राप्त केला. भाजपने त्रिशतक ठोकत 403 पैकी तब्बल 325 जागा जिंकल्या. या राज्यात भाजपने एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. होळी सण रविवारी साजरा होत असतानाच उत्तरप्रदेशात भाजपने एक दिवस अगोदरच विजयाची होळी साजरी केली. 2014 नंतर भाजपला या राज्यात मिळालेला हा दुसरा उदंड विजय आहे. विजयाची ही लाट शेजारच्या उत्तराखंड राज्यातही पोहोचली होती. भाजपने उत्तराखंड हे राज्यदेखील एकहाती ताब्यात घेतले. या राज्यात सर्वाधिक 57 जागा जिंकून भाजपने येथेदेखील एकहाती सत्ता प्राप्त केली. पंजाबमध्ये मात्र मोदींचा करिष्मा चालला नसून, दहा वर्षानंतर काँग्रेसची सत्तावापसी झाली आहे. सर्वाधिक 77 जागा जिंकून काँग्रेसने पंजाबची सत्ता ताब्यात घेतली. तर आम आदमी पक्षाला दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. ‘आप’ला दुसर्या क्रमांकाच्या 20 जागा मिळाल्या आहेत.
सत्ताधारी अकाली दल व भाजप आघाडीला 50 जागांचे नुकसान सोसून अवघ्या 18 जागांवर समाधान मानावे लागले. गोवा आणि मणिपूरमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहावयास मिळाली. मणिपूरमध्ये 15 जागांचे नुकसान सोसून काँग्रेस 27 जागांवर पोहोचली तर 21 जागा गतवेळपेक्षा अधिक जिंकून भाजप 21 जागांवर पोहोचले होते. 31 जागांची मॅजिक फिगर कोण गाठणार? असा प्रश्न या राज्यात निर्माण झाला होता. तर दुसरीकडे, भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या गोव्यात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाच पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसला सर्वाधिक 17 जागा तर भाजपला 13 जागांवर समाधान मानावे लागले. बहुमतासाठी 21 जागांची गरज असताना सत्ता स्थापनेसाठी तिढा निर्माण झाल्याने ही विधानसभा त्रिशंकु झाली आहे. आम आदमी पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही. इतर पक्षांच्या सहाय्याने काँग्रेस किंवा भाजप सत्ता स्थापन करू शकेल, असे तूर्त तरी चित्र होते.
अमेठीत काँग्रेसच्या गडाला भाजपचा सुरुंग
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीत काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले. अमेठी लोकसभा मतदारसंघातील चार पैकी तीन जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी असताना याठिकाणी मात्र दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.
कॅप्टन अमरिंदरसिंग यांना वाढदिवसाचे गिफ्ट
पटियाला । पंजाबमध्ये काँग्रेसच्या विजयाने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले असून, त्यांनी पटियाला मतदारसंघातून तब्बल 51 हजारांनी मतांनी विजय मिळविला. कॅप्टन अमरिंदरसिंग त्यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली. त्यांनी पटियाला व लाम्बी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यापैकी लाम्बी मतदारसंघामध्ये प्रकाश सिंग बांदल यांच्याकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला तर पटियाला मतदारसंघातून त्यांनी 51 हजार मतांनी विजय मिळवला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढत होणार हे सुरुवातीपासुनच दिसत होते.
इरोम शर्मिला पराभूत
मणिपूरमध्ये मुख्यमंत्री ओकराम इबोबीसिंह यांच्याविरोधात लढणार्या समाजसेविका इरोम शर्मिला यांचा पराभव झाला आहे. इरोम यांना जेमतेम 100 मते मिळाली असून, इबोबीसिंह यांना 15000 मते मिळाली. शर्मिला यांना जनतेने साफ नाकारल्याचे दिसून आले. गेल्या पंधरा वर्षांपासून मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. इबोबीसिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सलग तिसर्यांदा विजय मिळवला.
4 राज्यांत सत्ता स्थापणार : शहा
हिंदू-मुसलमान या तिढ्यातून तुम्ही बाहेर या! मतदार हा मतदारच असतो; त्यात हिंदू-मुसलमान असा भेद नसतो. विकास सर्वांनाच हवा असतो, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह गोवा व मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापन करणार असल्याचा दावा अमित शहा यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी आकडेवारी समोर येत आहे. मणिपूर आणि गोव्यामध्ये काँग्रेस-भाजपमध्ये चुरस आहे. या पत्रकार परिषदेत मात्र अमित शहा यांनी पंजाब वगळता इतर चारही राज्यांमध्ये पक्षाचा विजय झाला आहे, अशी भूमिका मांडली. पंजाबमधील पराभव त्यांनी मान्य केला. पंजाबमध्ये आम्ही पराभूत झालो असलो, तरीही मिळालेल्या मतांची टक्केवारी चांगली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये मिळालेला जनादेश ऐतिहासिक आहे. या विजयासाठी देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन! असे शहा म्हणाले. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये तीन चतुर्थांश बहुमत मिळाले आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वांत मोठा विजय असावा, असे वाटते. हा विजय त्या त्या राज्यांतील जनतेचा विजय आहेच; तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचाही विजय आहे. केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीवरच या निकालांनी पसंतीची मोहोर उमटविली आहे. ‘पंतप्रधान मोदी हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत लोकप्रिय नेते आहेत’ हे आता विरोधकांनीही मान्य करायला हवे. तीन वर्षांपूर्वी देशातील जनतेने मोदी आणि भाजपवर विश्वास दाखविला होता. हाच विश्वास अजूनही कायम आहे, हेच या निकालांमधून दिसले आहे, असे शहा म्हणाले.
इव्हीएम घोटाळा करून भाजपचा विजय : मायावती
उत्तर प्रदेशातील मुस्लिमबहुल भागात भारतीय जनता पक्षाला जास्त मते कशी मिळाली, असा प्रश्न करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असे खुले आव्हान बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी शनिवारी दिले. उत्तर प्रदेशातील मतदान यंत्रांत भाजपने गडबड केल्याचा आरोपही त्यांनी केला. देशातील लोकशाहीला यामुळे धोका निर्माण झाला असून, या प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे, असेही मायावती यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झंझावातासमोर समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बसपची वाताहत झाली. मायावतींच्या बसपला तर सर्वांत मोठा फटका बसला. त्यामुळे माायवती आणि बसपच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या निकालावर मायावती यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेत भाजपवर आगपाखड केली.
संघर्ष सुरूच राहणार : केजरीवाल
पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी जनता पक्षाला अपेक्षित यश मिळविता आले नाही. या पार्श्वभूमीवर आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निकाल स्वीकारला असल्याचे सांगत संघर्ष सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया ट्वीटरद्वारे दिली. जनतेचा निर्णय नम्र भावनेने स्वीकारला आहे. सर्व कार्यकर्त्यांची खूप मेहनत घेतली. संघर्ष सुरूच राहणार आहे, असे केजरीवाल यांनी नमूद केले. आम आदमी पक्षाला गोवा आणि पंजाबमध्ये यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही ठिकाणी काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. शनिवारी निकाल जाहीर होण्यापूर्वीच केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी विजय गृहीत धरत आनंद साजरा करण्याची तयारी केली होती. ‘जय हो’ हे गीत त्यांच्या निवासस्थानाबाहेर वाजत होते. दिल्लीतील विजयानंतर ‘आप’ने पंजाब आणि गोवा येथे आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता.
मोदींपेक्षा कोणीही मोठा नेता नाही : अब्दुल्ला
उत्तर प्रदेश, उत्तराखंड व मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा कोणी मोठे नाही. यामुळे 2019 विसरा आणि 2024च्या तयारीला लागा, असा सल्ला जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी शनिवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिला.
पाच राज्यांतील निकाल जाहीर झाल्यानंतर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘देशात सध्या तरी मोदींपेक्षा कोणीही मोठा नेता नाही. यामुळे 2019 विसरा आणि 2024 मध्ये होणार्या निवडणुकांसाठीच्या तयारीला लागा.’ पंजाब व गोव्यामध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे. परंतु, सगळीकडेच भाजपची मक्तेदारी नसल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे, असेही अब्दुल्ला यांनी यात म्हटले आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी जम्मू-काश्मिरातील परिस्थितीवरून भाजप सरकारला शालजोडीतील देखील हाणले.
ठळक बाबी
1 उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जनादेश स्वीकारला असून, त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु, सपा व काँग्रेस आघाडीचा केवळ 54 जागांवर विजय झाला आहे. तर बहुजन समाज पक्षाला अवघ्या 18 जागा मिळाल्या आहेत.
2 दहा वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर पंजाबमध्ये पुन्हा सत्ता प्राप्त करणार्या काँग्रेसने 117 जागांच्या विधानसभेत सर्वाधिक 77 जागा जिंकल्या आहेत. तर बहुमतासाठी 59 जागांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसने या राज्यात निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. तर आम आदमी पक्ष व अकाली दल-भाजप आघाडीला प्रत्येकी 20 व 18 जागा मिळालेल्या आहेत. या विजयामुळे काँग्रेसचे अमरिंदर सिंग हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
3 मणिपूर व गोव्यामध्ये भाजप व काँग्रेसमध्ये अतितटीची लढत झाली. या राज्यात काँग्रेसचे ओकराम इबोबी सिंग हे 15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी इरोम शर्मिला यांचा दारुण पराभव केला. तर गोव्यातदेखील या दोन पक्षात अतितटीची लढत झाली. काँग्रेस 17 तर भाजपला 13 जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नाही.
4 देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये काँग्रेसला जोरदार झटका बसला. सत्तधारी काँग्रेसचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचा दोन मतदार संघात पराभव झाला. तर भाजपने 57 जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले. काँग्रेसला 11 तर इतरांना केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.
5 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2008 मध्ये घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर उत्तर प्रदेशातील मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे. मिनी लोकसभा म्हणून ओळख असलेल्या या राज्यातील अभूतपूर्व विजयाने भाजपच्या राज्यसभेतील जागांतदेखील वाढ होणार आहे. त्यामुळे त्याचा राष्ट्रपती निवडणुकीतही भाजपला फायदा होईल. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेते म्हणून पुन्हा एकदा अपयशी ठरल्याने काँग्रेसला आपल्या नेतृत्वात बदल करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुशासन आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारावर शिक्कामोर्तब; युपीच्या जनतेने विकासाला मत दिले.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या राजकारणावर आठ दिवसानंतर बोलू… त्यानंतर काही उसळलेल्या लाटा थांबतील, अनेक सत्ता स्थापन केल्या जातील.
– खा. संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते