मोदी राजवटीच्या शेवटाची सुरुवात – छगन भुजबळ

0

विकासाचा अजेंडा बाजूला सारल्याने ‘एनडीए’तून बाहेर पडलो कुशवाह यांचे स्पष्टीकरण

पुणे : देशवासियांना अच्छे दिनची ग्वाही देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वांचा भ्रमनिराश केला आहे. पाच राज्यातील निवडणुकीत मतदारांनी भाजपला नाकारल्याने मोदी राजवटीच्या शेवटाची सुरुवात झाली आहे. अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशावह, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, पालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी महापौर अंकुश काकडे उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, मोदी लाटेचा अंदाज घेऊन भाजपमध्ये गेलेल्यांना आपला भ्रमनिरास झाला आहे, असे वाटत असेल तर त्यांनी परत येण्यास हरकत नाही. भाजपची अकल्याणकारी सत्ता घालवणे, हे सर्व विरोधी पक्षांचे उद्दीष्ट आहे. कोणीही पंतप्रधान होण्याची इच्छा अद्याप कोणी व्यक्त केलेली नाही. सर्व पर्याय खुले आहेत. आगामी निवडणुकीत अच्छे दिन वाले सरकार बाजूला सारून हमारे दिनवाले सरकार आणायचे आहे. त्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

राज्याचे मुख्यमंत्री होण्यास आवडेल का? या प्रश्‍नावर भुजबळ म्हणाले, आगामी निवडणुकीत पक्ष माझ्यावर काय जबाबदारी सोपवेल, हे मला आताच सांगता येणार नाही. कदाचित मला लोकसभेत पाठवले जाईल किंवा प्रचारासाठी मोकळेच ठेवले जाईल. मात्र, आपण सर्वजण मला मुख्यमंत्री करणार असाल तर माझी काहीच हरकत नाही.

स्वहिताचा अजेंडा पुढे रेटला

लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी विकासाचा अजेंडा मांडला होता. मात्र, सत्ता आल्यापासून भाजपने विकासाचा अजेंडा बाजूला ठेवून स्वहिताचा अजेंडा पुढे रेटला आहे. हा अजेंडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन एनडीएतून बाहेर पडलो आहे. संबंधीत खात्याच्या मंत्र्यांना विश्‍वासात न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच खात्यातील निर्णय घेतात, हे सत्य आहे. त्यात कोणतेही दुमत नाही. भाजप सत्तेवर सर्वच स्थरातील नागरिक नाराज आहे. देशातील शेतकरी नाराज आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत देशात सर्वत्र भाजपचा पराभव निश्‍चित आहे. सध्या आम्ही कोणाच्याही सोबत नाही. स्वतंत्र लढणे, महाआघाडीत सहभागी होणे किंवा तिसर्‍या आघाडीत सहभागी होणे, असे सर्व पर्याय खुले आहेत, असे राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी स्पष्ट केले.