अमित शहा यांचे विरोधकांवर टीकास्त्र; 2019 च्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले
शरद पवारसाहेब चहावाल्यांच्या नादी लागू नका : देवेंद्र फडणवीस
मुंबई । आगामी निवडणुकांचे रणशिंग शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फुंकले. दक्षिणेसह भारतावार सत्ता स्थापनेचे भाजपचे स्वप्न असल्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम बंगाल, ओदिशासह महाराष्ट्र आणि देशावर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा भाजपचा संकल्प आहे, असे अमित शहा भाषणात म्हणाले. 2019 चे काऊंटडाऊन सुरु आहे. मात्र देशातील सर्व विरोधक एकमेकांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. पूर आल्यावर सर्व लहान मोठे झुडपे वाहून जातात. पण एकच वटवृक्ष उभा राहतो, त्यावर पाण्याच्या भितीने सांप, मुंगूस, कुत्रे, मांजरं सगळेच आसरा घेतात; तसे मोदींच्या लाटेसमोर सर्वजण एकवटले आहेत, असे म्हणत शहांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहोचवा आणि 2019 च्या निवडणुकीत पुन्हा महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपचे सरकार निवडून द्या, असे आवाहनही शहा यांनी केले.
राहुलबाबांना पवारांचे इंजेक्शन!
भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त वांद्रे येथील बीकेसी संकुलात आयोजित महामेळाव्यात शहा बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व मंत्री यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अर्थात राहुल बाबा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागील चार वर्षातील हिशोब मागत आहेत. मात्र त्यांच्या पूर्वीच्या चार पिढ्यांनी केलेला राज्य कारभाराचा हिशोब देशातील जनता मागत असल्याचे सांगत, राहुल बाबा हे शरद पवार यांना भेटले असून, त्यांनी इंजेक्शन दिल्यानेच ते हिशोब मागत असल्याची टीका अमित शाह यांनी केली. मात्र राहुल बाबा आणि शरद पवार यांनी कान उघडे ठेवून ऐकावे की, देशातून मागासवर्गीय लोकांना दिलेले आरक्षण हटविणार नाही. आणि तुम्हीही हटविणार असाल तर ते आम्ही होवू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. ते काम तसेच पुढे नेणार असून, 2019 ची निवडणूक पुन्हा आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त करत, आगामी काळात पंजाब, पश्चिम बंगाल, ओदिशा राज्यातही भाजप स्वबळावर सत्ता आणणार असल्याची घोषणा करत कर्नाटकचा उल्लेख करण्याचे त्यांनी यावेळी टाळले.
महाराष्ट्राचे सिंचन 40 टक्क्यांच्या पुढे नेणार : गडकरी
महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर सिंचनक्षेत्र वाढवावे लागेल ते आम्ही 40 टक्क्यांच्या वर घेवून जावू, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. काही लोक महाराष्ट्रावर राज्य करणे आपला अधिकार समजत होते. ते निराश झालेत. जे प्रकल्प बंद पडलेत ते एक वर्षात पूर्ण करू. सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करु. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची समस्या होणार नाही. महाराष्ट्रात 1 लाख कोटी रुपये सिंचनासाठी दिलेत, असे त्यांनी सांगितले. ज्यांना प्रश्न पडलेत त्यांना आव्हान देतो त्यांनी शिवाजी पार्कात चर्चेला यावे. 4 लाख कोटी रुपयांचे रस्ते मंजूर केले. शिवाजी महाराजांचा नाव घेत महाराष्ट्राला लुटले. ते लोक महाराष्ट्रात जातपातीचे विष कालवत आहेत, असे गडकरी म्हणाले. शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. प्रत्येक निर्णय घेताना प्रत्येक हाताला रोजगार अन सामाजिक एकता कशी निर्माण होईल हे पाहिले जाते. हा पक्ष पिता पुत्रांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे. जे 50 वर्षात झाले नाही ते 5 वर्षात झाले हे पाहून काहीच पोट दुखतंय असे गडकरी म्हणाले
भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या; चंद्रकांतदादांचा अजित पवारांना इशारा
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बीकेसीच्या मैदानावर सुरू असलेल्या भाजपच्या महामेळाव्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधत अजित पवार, भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, असा थेट इशारा दिला. भाजपने बीकेसीच्या मैदानात जोरदार शक्तिप्रदर्शन केलेे. या महामेळाव्याला भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता आदी नेते आमदार, खासदार उपस्थित होते. या महामेळाव्यात महसूलमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात मित्र पक्ष शिवसेनेची बाजू घेत अजित पवार यांच्यावर हल्ला चढविला. शिवसेनेला गांडूळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहे. हल्लोबोल यात्रा काढणार्यांनी आधी स्वतःचा गल्ला भरला असून, भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत असे म्हणत पाटलांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
आगामी निवडणुकीतही भाजपचाच झेंडा फडकणार : फडणवीस
भटा-बामणांची पार्टी म्हणून हिणवलेल्या या पक्षामध्ये आज समाजातील प्रत्येक घटक असल्याचे फडणवीस म्हणाले. 2019 मध्ये भाजपचाच झेंडा लोकसभा निवडणुकीत फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आणि नरेंद्र मोदींसारखा नेता नाही असे सांगत, त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मोदीजींसारखा शेर सिंह आमच्या जवळ आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून एकदिलाने निवडणुकांना सामोरे गेलो तर 2019 मध्ये विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांमुळेच आपल्याला ही सगळी पदे मिळाली असल्याचे सांगताना फडणवीसांनी आपण सगळे मानसन्मान कार्यकर्त्यांना अर्पण करत असल्याचे सांगितले. तसेच येत्या निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
गटबाजी चव्हाट्यावर, मुंडेसमर्थकांची जोरदार घोषणाबाजी
या महामेळाव्याच्यानिमित्ताने भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. स्थापना मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे एकही पोस्टर नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले व त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांना शांततेचे आवाहन करावे लागले. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांचे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र, भाजपला महाराष्ट्रभरात पोहोचविणारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो कुठल्याही पोस्टरवर नाही. मेळाव्याला आलेल्या मुंडे समर्थकांना ही बाब खटकली आणि त्यांनी तिथेच घोषणाबाजीला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत आलेले गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टरही झळकावले. या पोस्टरवर पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांचे फोटो होते. काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या उचलून आपला संताप व्यक्त केला. अखेर कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना पुढे यावे लागले, त्यांनी व्यासपीठावर येऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. मुंडे समर्थकांच्या या नाराजीची चर्चा आता पक्षातच रंगली होती.
नाथाभाऊ खडसेंना पाचवे स्थान
महाराष्ट्रात भाजपच्या वाढीसाढी आपले उभे आयुष्य खर्ची घालणारे एकनाथ खडसे यांना भाजपच्या जाहिरातीत पाचवे स्थान दिले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रथम, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दुसरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तिसरे तर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना या जाहिरातीत चौथे स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रात भाजपला उभारी देण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मोलाचा वाटा असतानाही त्यांना पाचव्या स्थानावर टाकल्याने त्यांचे समर्थकही नाराज होते.