डॉ.युवराज परदेशी:
भाजपच्या विरोधातील विस्कटलेली नाराजी एकत्र करून लढायचे, की आपापसातील भांडणे चालू ठेवत भाजपच्या विजयाचा मार्ग खुला करायचा, हे कोडं उलगडणारी निवडणूक म्हणून बिहार विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जात होते. याचे निकाल हाती आल्यानंतर मोदी विरोधकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एनडीएने सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन पेच फसणार? हा प्रश्न आता विचारला जात आहे. भाजपा-जेडीयू आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर नितीश कुमार यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न सर्वस्वी भाजपावर अवलंबून असेल. निवडणूक प्रचारात आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत असे भाजपाचे नेते म्हणत होते. पण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजपा मुख्यमंत्री सोडेल का? हा कळीच मुद्दा आहे. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूला फारशी चमकादार कामगिरी करता आलेली नाही. प्रथमच राज्यात भाजपा मोठया भावाच्या भूमिकेत जाऊ शकतो, त्यामुळे नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भाजपावर अवलंबून असणार आहे.
बिहार अजूनही मागासलेले राज्य असूनही विकासापेक्षा इथे भावनिक आणि जातीय मुद्यांवर मोठ्या प्रमाणावर मतदान होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिहारचा राजकीय इतिहास हा बेभरवशाचा राहीला आहे. 2014मध्ये बिहारमधे लोकसभेत भाजप आणि रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या युतीला 40 पैकी 28 जागा मिळाल्या पण पुढच्याच वषी 2015 मध्ये नितीशकुमार, लालूप्रसाद आणि काँग्रेस यांच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत भाजपला धुळ चारली. पण नंतर नितीशकुमार एनडीएत आल्याने सारेच चित्र बदलले. त्यामुळे एनडीएला गेल्या वषी लोकसभेत 2014 पेक्षाही मोठे यश मिळून 40 पैकी 39 जागा भाजप, नितीश आणि पासवान यांच्या युतीला मिळाल्या. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आणि लालूप्रसादांच्या राजदला एकही जागा मिळाली नाही. यंदाच्या निवडणुकीतही मोठ्या उलथापालथी पहायला मिळाल्या पासवान यांनी एनडीएची साथ सोडत एकला चालो रे ची भुमिका स्विकारली.
तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांची एकत्र मोट बांधत महाआघाडी उभी करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर आव्हान उभे केले. या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारकिर्दीतील भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती या मुद्द्यावर भर देण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली होती. कोरोनाने आलेली मंदी, लक्षावधी बिहारी श्रमिकांची ‘घरवापसी’ आणि बिहारमध्ये नवे उद्योग येण्याचे अत्यल्प प्रमाण, नितीशकुमारांच्या करिष्म्याला लागलेली उतरती कळा या सार्याचा बिहारी मतदार कसा विचार करतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. विरोधकांनी राज्यातील बेरोजगारीचा मुद्दा प्रमुख बनविला तर भाजपाने आपला पुर्वीचाच लोकप्रिय फंडा वापरत भारत-चीन सीमेवरील तणाव, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान यांचा मुद्दा उचलून धरला बिहारवर तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून राज्य केलेल्या नितीशकुमारांना चौथ्यांदा मुख्यमंत्री व्हायचे आहे. ‘माझी शेवटची निवडणूक, विजय पदरात टाका’, असे भावनिक आवाहन करत मतदारांना साद घातली.
शेवटच्या क्षणापर्यंत अटातटीची लढाई मानल्या गेलेल्या निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. बिहारमध्ये मतदान झाल्यानंतर आलेल्या काही एक्झिट पोलमधून तेजस्वी यादव यांच्या एकतर्फी विजयाचे भाकित करण्यात आले होते. तर काही एक्झिट पोलनी महाआघाडीला स्पष्ट बहुमताचा कल वर्तवला होता. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनंतर मात्र एक्झिट पोलच्या अगदीच विपरित आकडेवारी समोर आली. यामध्ये महाआघाडीऐवजी एनडीएला आघाडी मिळाली. एक्झिट पोलच्या अगदी विरोधात निकाल लागत भाजपा आणि जेडीयू आघाडीला बिहारमध्ये बहुमत मिळाले. मात्र या आघाडीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने जेडीयूही चिंतेत आली आहे, हे उघड सत्य आहे. बिहार निवडणुकीत जेडीयूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही, पहिल्यांदाच इतक्या वर्षापासून आघाडीत जेडीयूला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे आघाडीत भाजपा मोठा भाऊ झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या 15 वर्षापासून नितीश कुमार बिहारमध्ये सत्तेत आहेत, त्यामुळे सरकारविरोधी फटका जेडीयूला बसला आहे. मात्र निवडणुकीच्या निकालामुळे मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांकडे राहणार का? सध्या या प्रश्नाची जोरदार चर्चा आहे. ‘ब्राण्ड नितीश’ला खिंडार पडलेले नाही, प्रस्थापित सरकारविरोधातील ही एक भावना आहे असे नितीश यांच्या जवळच्या नेतेमंडळींनी या निकालाचे वर्णन केले. ‘या निवडणुकीत मोदी यांच्या प्रतिमेने आम्हाला तारले’ असे भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले. निवडणुकीतील जेडीयूच्या खराब कामगिरीसाठी नितीश कुमार यांच्या टीमने करोना व्हायरस आणि चिराग पासवान यांच्यावर खापड फोडले आहे. 38 वर्षीय चिराग आपल्या संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान नीतीश कुमार यांना निशाणा बनवले होते. चिराग पासवानांचा लोक जनशक्ती पक्ष हा केंद्रात एनडीएचा घटक पक्ष आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आरजेडीचे युवा नेता तेजस्वी यादव यांची देशभरात चर्चा झाली.
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळाच लागला असला तरी येथील स्थानिकांनी तेजस्वीला आरजेडी पक्षाचे भविष्य आहे, या दृष्टीने कल दिला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश करणार्या तेजस्वी यादव यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने बिहारच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. या सर्व उलथापालथीत भाजपा आपले घोडे पुढे दामटण्यात यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बिहारसोबत गुजरातमधील पोटनिवडणुकीत सर्व आठ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशातील 28 जागांच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी भाजपाच्याच पारड्यात मते टाकली आहेत. यामुळे विरोधक कितीही ओरडत असले तरी अद्यापही मोदी लाट ओरसली नसल्याचे दिसून येत आहे.