लखनऊ । नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमधील लाजिरवाणा पराभव आणि दलित आमदारांनी उघडपणे व्यक्त केलेल्या नाराजीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी कानउघडणी केल्याचे समजते. यूपीमध्ये इतकी गडबड का आहे, असा जाब मोदी-शहांनी योगींना विचारल्याचेही बोलले जात आहे.
योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेला गोरखपूर व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या फुलपूरमधील पोटनिवडणुकीत नुकताच भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे देशभरातील भाजप विरोधकांना आत्मविश्वास वृद्धींगत होऊन भाजपला खूपच बॅकफूटवर जावे लागले होते. कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता होती. त्यातच 2 दिवसांपूर्वी भाजपमधील दलित खासदारांनी योगींच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. या सार्या पार्श्वभूमीवर योगी यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर ते अमित शहा यांनाही भेटले. यूपीतील राजकीय परिस्थितीबाबत दोघांनीही यावेळी योगींकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते कृष्ण गोपाळ व दत्तात्रय होसबळे यांनी नुकताच तीन दिवसीय यूपी दौरा केला. यूपीतील एकूण परिस्थितीबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री, मंत्री, पदाधिकारी, राज्यातील संघ नेते व स्वयंसेवकांशी चर्चा केली. त्यांच्याकडून काही गोष्टींची माहिती घेतली. यानंतर लगेचच योगी आदित्यनाथ यांनी मोदी व शहांची भेट घेणं महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.