मोदी, शहांनी आत्मचिंतन करावे; झारखंडच्या निकालावरून सेनेचा भाजपला टोला !

0

मुंबई: महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही भाजपला झटका बसला आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस आघाडीला जवळपास बहुमत मिळाले आहे. देशातील ७ राज्यातून भाजपची सत्ता गेली आहे. दरम्यान झारखंडच्या निकालावरून शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी संपूर्ण ताकद पणाला लावूनदेखील भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली. त्यामुळे आता त्यांनी याबद्दल आत्मचिंतन करावे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. मतमोजणी सुरु असताना भाजपा २८ जागांवर पुढे आहे. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीने ४२ जागांचा टप्पा गाठला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा २४, काँग्रेस १३, तर राष्ट्रीय जनता दल ५ जागांवर आघाडीवर आहे.

झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी संपूर्ण ताकद लावली होती. सुधारित नागरिकत्व कायदा आणून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपाने करुन पाहिला. मात्र मोदी-शहांचे प्रयत्न वाया गेले. झारखंडमधील जनतेनं भाजपाला नाकारलं. महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडदेखील भाजपाच्या हातातून निसटले आहे. भाजपाने याचे आत्मचिंतन करावे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला.