मोदी, शहांनी युवकांचे भविष्य उद्धवस्त केले: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सध्या देशातील राजकारण तापले आहे. भाजपकडून कॉंग्रेस आणि विरोधी पक्षावर अफवा पसरविले जात असल्याचे आरोप होत आहे. तर विरोधकांकडून भाजप संविधानाच्या विरोधात जाऊन असंवैधानिक कामगिरी करत असल्याचे आरोप होत आहे. दरम्यान आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत झालेल्या जाहीर सभेतही यावर भाष्य करत, विरोधकांकडून अपप्रचार सुरु असल्याचे आरोप केले. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कायदा केल्याचे मोदींनी सांगितले. त्यातच कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी यावरून मोदींना लक्ष केले आहे. ढासळती अर्थव्यवस्था, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून राहुल गांधी यांनी मोदी आणि शाह यांच्यावर निशाणा साधला. देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, रोजगाराच्या प्रश्नांमुळे मोदी सरकार तुमच्या रागाचा सामना करू शकत नाही. मोदी आणि शाह यांनी तुमचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे,” असा आरोप राहुल यांनी केला. ट्वीट करून राहुल गांधींनी हे आरोप केले.

डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विशेषतः गेल्या आठवड्यात पंतप्रधानाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. त्यावरूनही विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दुसरीकडं सुधारित नागरिकत्व कायद्यावरून ईशान्येकडील राज्यांसह संपूर्ण देशभरात विरोध होऊ लागला आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांनी काढलेल्या आंदोलनानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले.