मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी आणि भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आता मनसेनेही त्यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी शहाची टोळी हरेल तेव्हा आमचे सुतक सुटेल’ असे ट्विट मनसेचे प्रवक्ते अमेय खोपकर यांनी केले आहे.
साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना खोपकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘मुक्ताफळं म्हणावं की गटारगंगा? हा प्रश्न पडला आहे. स्वत:ला साध्वी म्हणवणाऱ्या भोपाळच्या उमेदवारामुळे आमच्या करकरे साहेबांविषयी नको ते बरळून या कथित साध्वीने भाजपाची देशभक्ती नक्की कशी असते हे दाखवून दिलंय. याचा नुसरा निषेध करुन भागणार नाही, जेव्हा ही मोदी- शहांची टोळी निवडणूक हरेल तेव्हाच आता आमचं सुतक संपेल’.