बाकी काही म्हणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना तोड नाही. त्यांनी भावी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी रामनाथ कोविंद यांना जाहीर करून देशातल्या सार्या विरोधी पक्षांना भोवर्यात अडकवलं आहे. नाव जाहीर करताना रामनाथ यांची ‘दलित’ ही जात सांगून शहा यांनी आपण अति‘शहा’णे आहोत, हे स्पष्ट करत त्यातलं राजकारणही उघड केलं.
भारतीय जनता पक्षाने कुणाला उमेदवारी द्यावी हा त्या पक्षाचा प्रश्न असला तरी देशाच्या सर्वोच्च पदाबाबत तडजोडी होऊ नयेत, ही आज जनभावना दिसते. विशेषत: राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची जात आणि त्यानिमित्ताने खेळलं जाणारं राजकारण, त्याबद्दल होणारी शेरेबाजी ही चिंताजनक आहे.
ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबद्दल काही मानदंड ठरवायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केलीय. देशातल्या बुद्धिजीवी वर्गात यासंबंधी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गुप्ता यांचं म्हणणं असं की, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार असलेली व्यक्ती सर्व देशाला माहिती हवी. तिच्या कामाची गुणवत्ता निर्विवाद हवी. तिचा बायोडाटा तगडा हवा. गुप्तांनी मांडलेली मतं काही पहिल्यांदा मांडली गेली आहेत असं नाही. यापूर्वीही ती अनेकांनी मांडली आहेत. त्यावर पुष्कळ चर्चाही झालेली आहे. आताही चर्चा होत आहेच. ही मतं कुणालाही पटतील अशीच आहेत. पण राजकीय पक्ष हे त्यांच्या चालीने चालतात. स्वत:ची सोय ते पाहत असतात. यापूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसपक्षानेही राष्ट्रपतीपदाचा काही कमी खेळ केला नव्हता. काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांचं नाव पुढे आणलं, तेव्हाही वेगवेगळ्या चर्चांना उत आला होता. त्यावेळी ‘मराठी’ कार्डाचा बोलबोला होता. त्यांच्याही गुणवत्तेविषयी चर्चा झाली होतीच. असो. आता रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करून मोदी-शहा यांनी भाजपमधील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांच्यावर मात केली आहे. रामनाथ हे सच्चे स्वयंसेवक असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आनंदीआनंद असणं साहजिक आहे. त्यात रामनाथ हे ‘हिंदू-दलित’ आहेत. पुन्हा कोळी आहेत. देशातल्या एकूण दलितांमध्ये फूट पाडून ‘आपले दलित’ आणि ‘इतर दलित’, अशी विभागणी करणं हा संघाच्या रणनीतीचा भाग आहे. यानिमित्ताने ते दिसलं.
या दलित कार्डाचं अति‘शहा’णपण बघा. दलितांच्या नेत्या असलेल्या मायावती यांनासुद्धा ही उमेदवारी पचवता येईना आणि नाकारताही येईना. मायावती यांनी या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद देऊन पत्रकार परिषदेत स्वत:ची झालेली अडचण स्पष्ट केली. रामनाथ हे उत्तर प्रदेशातले आहेत. भाजपने त्यांना पुढं करून या राज्यात स्वत:ची दलित व्होट बँक बांधण्याचा सतत प्रयत्न केला आहे. रामनाथ हे निवडणुकीच्या राजकारणात नेता म्हणून कधीही यशस्वी झाले नाहीत. मूळचे ते वकील. वकिली करत भाजपच्या दलित सेलचं संघटनात्मक काम ते बघत असत. मितभाषी, कोणत्याही वादात न पडणं, प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहत काम करणं, संघाच्या विचारांशी बांधिलकी, या त्यांच्या जमेच्या बाजू, त्यांना आता कामाला आल्या आहेत.
भाजपने पूर्वी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी घोषित करून आजच्यासारखंच विरोधकांना अडचणीत आणलं होतं. तेव्हाही कलाम यांच्या मुस्लीम असण्याचं भाजपने राजकारण केलं होतं. त्यात कलाम हे ब्रह्मचारी असणं, त्यांची ‘गीता’वरील श्रद्धा, त्यांची ‘मिसाईल मॅन’ अशी प्रतिमा, त्यांचं अणुबॉम्ब बनवण्यातलं योगदान, अशा वर्चस्ववादी गोष्टींना वारेमाप प्रसिद्धी मिळवून दिली होती. कलाम ‘मुस्लीम’ आहेत, पण ‘आमच्या पसंतीचे मुस्लीम’, आम्हाला ‘हवे तसे मुस्लीम’ आहेत. मुस्लिमांनी असं असायला हवं म्हणजे मग भारी होईल, अशी मांडणी तेव्हा संघ परिवार करत असे. आताही रामनाथ कोविंद यांनी त्यांचं घर कसं दान केलंय, ते जात-धर्म समन्वयाचं कसं केंद्र बनलंय, याच्या बातम्या पेरल्या जात आहेतच. यानिमित्ताने आगामी काळात रामनाथ हे चांगले राष्ट्रपती आहेत की नाहीत याविषयी चर्चा होणार नाही, असं दिसतंय. चर्चा होणार ती ते कसे ‘चांगले दलित’ आहेत याची. ‘चांगलं दलित’ असणं म्हणजे काय याची संघ परिवाराची मांडणी खूप जुनी आहे.
संघाच्या विचारवंतांनी ‘चांगले दलित’ कसे असावेत हे मांडण्यासाठी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यासाठी हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर यांची तुलना केली आहे. हे दोघेही कसे हिंदू धर्मसुधारक होते, हे या पुस्तकांत हुशारीने मांडलेलं आहे. संघ परिवार डॉ. आंबेडकरांचे दोन भाग करतो. पहिला, ‘हिंदू धर्म त्यागण्यापूर्वीचे आंबेडकर’ आणि दुसरा, ‘नंतरचे आंबेडकर’. यातले ‘हिंदू आंबेडकर’ संघाला सोयीचे वाटतात, वाटत आले आहेत. त्यामुळे संघ परिवार याच आंबेडकरांचे दाखले हुशारीने वेळोवेळी देत असतो.
रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होतील हे आता जवळपास स्पष्ट आहे. विरोधी पक्षांनी कुणीही उमेदवार दिला तरी ते केवळ नगाला नग देण्यापुरतं असणार आहे. उत्तर प्रदेशातला दलित राष्ट्रपती होणार म्हणून मुलायमसिंह यादव आणि मायावती यांना नमतं घ्यावं लागणार आहे. काँग्रेस आता फक्त औपचारिकता म्हणून ही निवडणूक कर्मकांडासारखी लढेल. इतर छोट्या राजकीय पक्षांना या निवडणुकीत फारसं काही स्थान नसणार आहे. यामुळे डॉ. कलामांच्या रूपाने ‘चांगला मुस्लीम राष्ट्रपती’ दिल्यानंतर ‘चांगला हिंदू-दलित’ राष्ट्रपती देशाला देण्यात संघपरिवाराला जवळजवळ यश आलं आहे, हे स्पष्ट आहे.
शेखर गुप्तांनी अपेक्षा केल्याप्रमाणे यापुढे आपल्या भावी ‘चांगल्या हिंदू-दलित’ राष्ट्रपतींच्या कामांची चर्चा टळेल. आणि ते कसे ‘हिंदू-दलित’ म्हणून थोर आहेत याचं माहात्म्य आपल्याला अधिकाधिक ऐकायला मिळेल. ते ऐकायला आपण तयार असलं पाहिजे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांत प्रथम अमित शहा यांचं ‘शहा’णपण ओळखलं. त्यांनी प्रतिक्रिया दिली ती महत्त्वाची आहे. ते म्हणाले की, संघाला 2019नंतर संविधान बदलायचं आहे. त्यासाठी ही योजना आहे. रामनाथ हे हिंदू दलित, घटनातज्ज्ञ, वकील आहेत. त्यांच्याच हातून हे काम संघ करवून घेऊ पाहत आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा हा आरोप राजकीय असला तरी त्यातलं राजकारण समजून घेतलं तर ही उमेदवारी जाहीर करण्यात संघ परिवाराचा किती विचारपूर्वक डावपेच आहे हे दिसून येतं.
2019नंतर संविधान बदलण्याचं धाडस अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणतात तसं संघ करेल की नाही हे बघायला मिळेलच, पण त्याआधी आपल्या राष्ट्रपतींना ‘चांगला हिंदू-दलित’ म्हणून संघ प्रोजेक्ट करत राहील, हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. सध्याचा जमाना मार्केटिंगचा आहे. त्या मार्केटिंग तंत्रात भाजपने पूर्वीच सर्व पक्षांवर मात केली आहे. आता ‘चांगल्या हिंदू-दलित’ राष्ट्रपतींचं ब्रँडिंग होईल. देशातल्या समस्त जनांना ‘चांगला हिंदू-दलित’ होण्यासाठी नवा स्टोर्या, न्यूज, शकली, चर्चा, कार्यक्रम, कर्मकांड यातून उपदेश केला जाईल. त्यासाठी आपल्या उत्साही वृत्तवाहिन्या, त्यातले अँकर आतपासूनच सज्ज झाले आहेत.
शेखर गुप्ता म्हणतात तसं राष्ट्रपतीपदाची व्यक्ती सर्वांना आपल्या कामाने परिचित असावी. कोविंद सध्या तसे नाहीत म्हणून काय झालं? यापुढे ते होईल याची खात्री त्यांनी जरूर बाळगावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतरचे सर्वांत ‘चांगले हिंदू-दलित’, थोर व्यक्ती आणि पुन्हा देशाच्या सर्वोच्च पदी बसलेले राष्ट्रपती, अशी रामनाथ कोविंद यांची ख्याती नक्की होईल. अमित शहा यांच्या ‘शहा’णपणाचा विजय असो!
– राजा कांदळकर
संपादक, लोकमुद्रा मासिक