8 महिन्यात 559 एकर जमीन खरेदी
रत्नागिरी : नाणारमध्ये तीन लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या रत्नागिरी रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण सध्या सुरु आहे. या जमीन अधिग्रहण प्रक्रियेतून धक्कादाखक बाब समोर आली असून, नाणारमध्ये जमीन विकणारे हे 86 पैकी 38 जण व्यापारी आहेत. यामध्ये मोदी, जैन, शाह, झुनझुनवाला यांची नावे आहेत. 2 मे 2017 ते 19 जानेवारी 2018 दरम्यान म्हणजे फक्त आठ महिन्यांत व्यापार्यांनी जवळपास 559 एकर जमीन खरेदी केली आहे. यावरुन राजकारणी आणि व्यापार्यांचे साटेलोटे उघड झाले आहे. येथील स्थानिकांनीही तसा आरोप केला आहे.
परप्रांतिय व्यापार्यांनी जमीन खरेदी केली
एकीकडे स्थानिक विरोध करत असताना जमीन खरेदी करणार्या व्यापार्यांनी जे आता मालक आहेत त्यांनी आधीच एनओसी देऊन टाकली आहे. व्यापार्यांना या प्रकल्पाची माहिती कशी काय मिळाली? येथील जमीन खरेदी करण्यात त्यांना अचानक इतका रस का वाटला? काही राजकारण्यांनी व्यापार्यांना नाणारमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता का?, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. या व्यापार्यांना तब्बल 200 टक्के नफा होणार असून, तोदेखील सफेद पैशांमध्ये होणार आहे, अशी माहिती नाणारमधील स्थानिकांनी दिली. 18 मे 2017 रोजी राजापूरमध्ये जमीन अधिग्रहणाचे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर या जमिनींची खरेदी-विक्री झाली. ज्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यांच्यात मोदी, जैन, मुदीराज, वाधवा, मुदियार, सिंघव, निलवर, शाह, दोशी, कटारिया, केडिया, चंदर, थाववरी, रथी आणि झुनझुनवाला यांचा समावेश आहे. यांच्यात काही जाधव, कारंजे, देवळेकर, जोशी असे महाराष्ट्रीयनदेखील आहेत.