मोदी सरकारचा रविवारी खांदेपालट!

0

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार असून, रविवारी सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठस्तरीय नेत्याने दिली. सकाळी 11 वाजेच्या सुमारास शपथविधी होण्याची शक्यता असून, तशी तयारी सुरु होती. केंद्रीयमंत्री राजीव प्रताप रुडी, उमा भारती, संजीव बालियान आणि फग्गनसिंह कुलस्ते यांच्याकडून मंत्रिपदाचे राजीनामे घेण्यात आले असून, त्यांनी आपले राजीनामे कुरबूर करत पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्त केले आहेत. तर कलराज मिश्र यांच्यासह आणखीही काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचे सांगण्यात आले. महेंद्रनाथ पांडे यांना उत्तरप्रदेश भाजपचे अध्यक्ष बनविण्यात आल्याने त्यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाणार आहे. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळेल, याबाबतचे पत्ते पक्षाध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान मोदी यांनी गोपनीय ठेवले होते. 2019ची लोकसभा निवडणूक लक्षात ठेवून हा विस्तार केला जाणार असून, त्यात जनता दल (संयुक्त)चे दोन, शिवसेनेला एक तर तेलुगू देसम पक्षाचा एक सदस्य यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. स्वतंत्र संरक्षणमंत्री आणि सुरेश प्रभू यांच्याऐवजी रेल्वे मंत्रालय अन्य कुणाकडे देण्यासाठीही दिल्लीत हालचाली गतिमान झाल्या होत्या. त्यानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘प्रमोशन’ दिल्या जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्तही वरिष्ठस्तरीय नेतृत्वाकडून देण्यात आले आहे.

कामकाजाची एक्सेल शीट पाहून घेतला गेला निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामकाजाचा अहवाल तयार केला होता. ज्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे, त्यांच्या कामकाजाची एक्सेल शीट पाहूनच मोदी-शहा यांनी त्यांना वगळण्याचे ठरविले आहे, अशी माहितीही वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. या मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर सकारात्मक-नकारात्मक अशी श्रेणी तयार करण्यात आली होती. ज्या मंत्र्यांना नकारात्मक श्रेणी मिळाली आहे, त्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळून पक्षाच्या कामात गुंतविले जाणार आहे. भाजपने मंत्र्यांना जनतेत जाण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी किमान-समान कार्यक्रमही थोपविला होता. यापैकी अनेक मंत्र्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. त्यात खास करून संकल्प ते सिद्धी यात्रा, तिरंगा यात्रा, ‘पटेल-दिनदयाल, तीन साल बेमिसाल‘ यात्रा असे दौरे कार्यक्रम ठरवून दिले होते. बहुतांश मंत्र्यांनी यापैकी कोणतेच दौरे केले नाहीत, असे आढळून आले आहेत. केंद्राच्या योजनांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यातही अनेक मंत्री अपयशी ठरलेत, त्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे.

फडणवीस यांना प्रमोशनची संधी?
मंत्रिमंडळाच्या विस्तारात देशाला स्वतंत्र संरक्षणमंत्री देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यासाठी शुक्रवारी नवी दिल्लीत अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. मनोहर पर्रिकर यांना गोव्याचे मुख्यमंत्रिपद देण्यात आल्यापासून हे महत्वाचे खाते अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आहे. संरक्षण खात्याचा अतिरिक्त पदभार सांभाळताना जेटली यांची त्रेधातिरपीट होत आहे. भारत-चीन सीमाप्रश्न आणि संरक्षणाचे इतर मुद्दे पाहाता, स्वतंत्र संरक्षणमंत्र्यांची मागणी पुढे आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात प्रमोशन देऊन संरक्षणमंत्री बनविण्याबाबत मोदी-शहा यांचे एकमत झाले असल्याचेही सांगण्यात आले. या शिवाय, सुरेश प्रभू यांच्या रेल्वे मंत्रिपदाबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. मंत्रिमंडळातून कुणाला डच्चू मिळणार आणि कुणाला संधी मिळणार याबाबतचे पत्ते अमित शहा यांनी गोपनीय ठेवले असले तरी काही मंत्र्यांना राजीनामा देण्याचे सूचविण्यात आले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत दिवसभर चर्चांना ऊत आला होता.

यांच्या नावाची होती चर्चा!
– देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, संरक्षण किंवा रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी
– विनय सहस्त्रबुद्धे, महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
– भूपेंद्र यादव, भाजपचे राष्ट्रीय महासचिव, राजस्थानमधून राज्यसभा सदस्य
– प्रल्हाद जोशी, कर्नाटक भाजपचे माजी अध्यक्ष, लोकसभेत खासदार
– हरिष द्विवेदी, उत्तरप्रदेशातून खासदार
– सुरेश आंगडी, कर्नाटकातून खासदार
– अश्विनी चौबे, बिहारमधून खासदार
– सत्यपाल सिंह, उत्तरप्रदेशातून खासदार
– हेमंत बिश्व शर्मा, आसाम सरकारमध्ये मंत्री
– ओमप्रकाश माथूर, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, युपी प्रभारी
– संतोष कुशवाहा, जेडीयूचे बिहारमधील खासदार
– आरसीपी सिंह, जेडीयूचे बिहारमधील खासदार