मुंबई-देशातील शेतकरी आपले हाल उघड्या डोळ्याने बघतो आहे. सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाऐवजी आत्महत्या दुपटीने वाढल्या. सरकार यावर विचार न करता तेच ते जुमले ऐकवत आहे. त्यामुळे ‘जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईलच, अशा घणाघाती शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या’सामना’तून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
२०१९ मधील आश्वासन पाळणे नाही
‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेद्र मोदी यांना थेट लक्ष्य करण्यात आले. ‘२०२२ पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार’, अशी गर्जना मोदी यांनी केली. २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यातही भारतीय जनता पक्षाने हेच आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. गेल्या चार वर्षात भाजपचे पीक जोमात वाढले आणि देशातील शेतकरी आणि शेतीचे क्षेत्र मात्र कोमात गेल्याचा आरोप अग्रलेखातून करण्यात आला.
कर्जमाफीव ताशेरे
शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे. ‘बहुत हुआ किसान पर अत्याचार, अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा देऊन सरकार सत्तेवर आले. मात्र, शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने न्याय मिळाला का? असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वेळेवर भांडवल उपलब्ध होत नाही. बँकांना चुना लावणाऱया बडय़ा उद्योजकांसाठी मात्र बँका गालिचे अंथरत असल्याचा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला. राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीवर अग्रलेखातून वाभाडे काढण्यात आले आहे. सतराशे साठ अटी-शर्ती लादून सरकारने कर्जमाफी रखवडून ठेवल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.