मोदी सरकारने कृषीपासून व्यापारापर्यंत सगळ्या क्षेत्रांचा विनाश केला – यशवंत सिन्हा

0

कोलकाता : मोदींनी सबका साथ सबका विकासचा नारा दिला खरा. पण सबका साथ घेऊन त्यांनी सबका विनाश केला आहे. कृषीपासून व्यापारापर्यंत सगळ्या क्षेत्रांचा विनाश मोदी सरकारने केला आहे, अशी जोरदार टीका माजी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी सभेत बोलताना केली आहे. केंद्रातील मोदी सरकारविरोधात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या सभेत तब्बल २२ पक्षांनी हजेरी लावत विरोधकांची एकजूट दाखवली. या सभेत संबोधित करताना देशभरातील महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाना साधला.

कोलकात्यामध्ये भाजपविरोधी युतीची मोट बांधण्यासाठी आज सर्व विरोधी पक्षनेते एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला, अरूण शौरी,काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघ्वीसह अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.ममता बॅनर्जींनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला २२ पक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली आहे. यामध्ये प्रादेशिक पक्षाच्या प्रतिनिधींची संख्या अधिक आहेत. शरद पवार, फारूक अब्दुल्ला कार्यक्रमाला आले असले तरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली नाही.

या कार्यक्रमात बोलताना यशवंत सिन्हा यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. मोदी किंवा भाजप हा मुद्दा नसून या देशातील लोक आणि त्यांच्या समस्या आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपला सत्तेतून बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व विरोधकांनी भाजप विरोधात एकच उमेदवार द्यावा. भाजपचा पराभव मग निश्चित होईल’ असं सिन्हा यांनी म्हंटले आहे. यावेळी इतरही नेत्यांनी आपली मत व्यक्त केली आहेत. मोदी सरकार सूड भावनेने राज्य करत आहेत असं अभिषेक मनु सिंघ्वी म्हणाले तर देश वाचवण्यासाठी भाजपला पराभूत करा असे आवाहन शरद यादव यांनी केले.