यवतमाळ जिल्ह्यातील दुर्देवी घटना
यवतमाळ : डोक्यावर वाढलेला तीन लाख रुपयांच्या कर्जाचा डोंगर आणि नापिकी यामुळे जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकर्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. शंकर भाऊराव चायरे असे मृत शेतकर्याचे नाव असून, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमुळेच आपल्यावर आत्महत्येची वेळ आल्याचे नमूद केले आहे. चायरे यांनी सुरुवातीला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून ते वाचल्याने विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मोदी सरकारच्या धोरणामुळे शेतकर्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे या घटनेने निदर्शनास आले आहे.
कर्जमाफीचा काहीही लाभ नाही!
घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांच्याकडे सहा एकर शेती असून, त्यांनी यावर्षी कापूस आणि तूर या पिकांची लागवड केली होती. मात्र बोंडअळीने त्यांचे सर्व पीक उद्ध्वस्त केले होते. त्याआधी गतवर्षीदेखील त्यांच्या हातातून अशाचप्रकारे पीक गेले होते. त्यांच्यावर सुरुवातीला 80 हजारांचे कर्ज होते. ते वाढत जाऊन तीन लाख रुपये झाले. कर्जमाफी योजनेचा त्यांना काहीच लाभ झाला नाही. परिणामी, त्यांच्यात नैराश्य आले होते. आत्महत्येपूर्वी चायरे यांनी सहा पानी चिठ्ठी लिहिली असून, त्यात नमूद केले आहे, की कर्जबाजारी झालो त्यामुळे आत्महत्या करतो आहे. या आत्महत्येला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार आहे. माझ्या मुलांकडे आणि घरातल्यांकडे लक्ष ठेवा, असे नमूद करून चायरे यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्च्यात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, सरकारविरोधात संतापाची लाट आली आहे.