मोदी सरकार अंबानी-अदानींचे!

0

भाजप खासदार नाना पटोलेंचा पुन्हा स्वपक्षावर हल्लाबोल

अकोला : अंबानी-अदानीच्या फायद्याचे निर्णय घेऊन त्यांच्यासोबत आपलीही घरे भरण्याचे काम देशात सुरू असल्याचा आरोप भाजपचे खासदार नाना पटोले यांनी अकोल्यातील शेतकरी संवाद सभेत केला. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत ठोस पावले उचलली न गेल्यास इतिहासाची पुनरावृत्ती करू, असा इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, ते लगेच चिडतात, अशी टीपण्णी करून पटोले यांनी खळबळ उडवून दिली आहे.

नदी जोड प्रकल्पाकडे दुर्लक्ष
अकोल्यात शेतकर्‍यांशी बोलताना खासदार पटोल म्हणाले, शेतीच्या पाण्यासाठी व्यवस्थाच निर्माण झालेली नाही. नदीजोड प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी निसर्गावरच अवलंबून राहिला पाहिले, हाच त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे उत्पादन कमी मिळेल आणि मग विदेशातून धान्य आणता येईल. विदेशातील या धान्यात अंबानी-अदानीला फायदा कसा करून देता येईल आणि त्याच्या कमिशनमधून घरे कशी भरता येतील, हेच सुरू आहे, असा असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.

तर ती खुर्चीच परत देऊ..
राज्यातील देवेंद्र सरकारवरही पटोले यांनी शरसंधान केले. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडता येत नसतील तर ती खुर्चीच परत देऊ, असा इशारा खासदार पटोले यांनी दिला. येत्या काही दिवसांत कर्जमाफीबाबत ठोस निर्णय झाल्यास आपण इतिहासाची पुनरावृत्ती करू, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे खासदार नाना पटोले यांनी भाजपशी खुलेआम सुरू केलेले हे बंड पेटण्याची शक्यता आहे. 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना नाना पटोले यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आमदारकीचा राजीनामा दिला होता. याची आठवणही पटोले यांनी उपस्थितांना करून दिली.