मोदी सरकार अपयशी ठरले

0

पुणे । केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात देशाची अर्थव्यवस्था खालावली असून निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात सरकारला अपयश आले आहे. नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. दलितांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे. देशात धार्मिक तेढ निर्माण झाल्याने असुरक्षिततेचे वातावरण आहे. काँग्रेस सरकाच्या योजनांचे नामांतर करून जाहिरातबाजीच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचे काम मोदी सरकारने केल्याची टीका जयराम रमेश यांनी पुण्यात केली.

पुण्यात माध्यमांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मोदी सरकारच्या कामगिरीचा पंचनामा करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयराम रमेश बोलत होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार मोहन जोशी, अनंत गाडगीळ, उल्हास पवार, अभय छाजेड याप्रसंगी उपस्थित होते.

गुंतवणूक दर रसातळाला
रिपॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग करून जुन्या योजनांना नवी आकर्षक नावे देण्यात मोदींचा हात कोणीही धरू शकत नाही. 15 वर्षांतील गुंतवणूक दर रसातळाला पोहोचला आहे. विजेचे उत्पादन कमी झाले आहे. देशांतर्गत गुंतवणूक कमी होत आहे. डाळ खरेदी, व्यापमं, पनामा पेपर, असे गैरव्यवहार समोर आले आहेत. ललित मोदी, विजय मल्ल्यांना पळून जाण्यास मदत केली जात आहे. सरकारकडून सीबीआय, अंमलबजावणी संचालनालयाचा (इडी) शस्त्रासारखा वापर होत असल्याने दहशत पसरल्याची खंत रमेश यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान झाल्यावर जीएसटीचा साक्षात्कार
युपीए सरकारने जेव्हा जीएसटी विधेयक आणले, तेव्हा मोदींनी कडाडून विरोध केला होता. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना जीएसटी योग्य असल्याचा साक्षात्कार झाला. नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिने उलटून गेले तरी किती काळा पैसा सापडला, यावर पंतप्रधान आणि अर्थमंत्री मौन बाळगून आहेत. दरवर्षी 2 कोटी रोजगारांचे आश्वासन देणार्‍या मोदी सरकारच्या काळात 2016 मध्ये केवळ अडीच लाख रोजगार निर्माण झाले आहेत. पिक विमा योजनेतून खासगी कंपन्यांच्या तुंबड्या भरल्या जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

2019 मध्ये काँग्रेसची सत्ता
यापूर्वीही आमचा निवडणुकीत पराभव झाला आहे. परंतू पुन्हा सत्तेत आलो होतो. गेली दहा वर्षे आम्ही सत्ता सांभाळली. 2019 मध्ये पुन्हा मोदी सरकार येईल, असा दावा केला जात आहे. मात्र, तेव्हा निकाल वेगळा असेल, अशी आशा विविध राज्यांच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर बोलताना जयराम रमेश यांनी व्यक्त केली.

लवासाविरोधात निर्णय दिल्याने देशद्रोही
लवासाचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले, मी पर्यावरणमंत्री असताना लवासा प्रकल्पाला स्थगिती दिली होती. त्यावेळी आपल्यावर देशद्रोही अशी टीका झाली होती. त्यासंदर्भातील खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे. मात्र, सत्तेत असताना असे निर्णय घ्यावे लागतात, असेही त्यांनी नमूद केले.