सोलापूर: मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती पथावर आहे. देशाला नवीन ओळख मिळू लागली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत मोदींच्या नेतृत्वात १ लाख लोकांची ‘हाऊडी मोदी’सभा झाली. त्या सभेत डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. या पूर्वी अशा कोणत्याही भारतीय नेत्याची सभा अमेरिकेत झाली तरी एक मंत्रीही उपस्थित नसायचे. मोदी फक्त भारताचे नाही तर जगाचे नेते आहेत. त्यांचे वैश्विक नेतृत्व जगाने मान्य केले आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. सोलापुरातील नातेपुते येथे विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
या निवडणुकीत आमची लढाई कोणाशी हे कळत नाही, समोर कोणी दिसत नाही, आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत पण समोर लढणारा पैलवान तयार नाही अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. काँग्रेसचे प्रमुख नेते निवडणूक असताना बँकाँकला फिरायला गेले. शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बचे तो मेरे पीछे आओ अशी राष्ट्रवादीची अवस्था आहे असे सांगत भाजपा-शिवसेना मित्रपक्षाच्या महायुती अभूतपूर्व यशाने निवडून येणार याबाबत शंका नाही असा दावा फडणवीस यांनी केला.