मोपलवारांची ‘टेप’ वाजली; विधानसभेत गदारोळ!

0

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या 8 व्या दिवशी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता व समृद्धी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. महेता यांनी मुख्यमंत्र्यांच्या पश्च्यात मंजूर केलेल्या फाईलीचा गोंधळ सुरू असतानाच, नवीन प्रकरणातदेखील त्यांचा हात असल्याचे सांगत विरोधकांनी महेता यांच्या राजीनाम्यासाठी गदारोळ करत सभात्याग केला. याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मोपलवार यांच्या ऑडियो क्लिपमध्येदेखील मोठ्या गैरव्यवहारावर चर्चा केल्याचे समोर आले असून, त्यांना तत्काळ निलंबित करण्याच्या मागणीनेही दिवसभर विधानसभेत रान उठवले. दरम्यान, मी या प्रकरणी कुठलाही खुलासा केला नसून विधानसभेतच खुलासा करू, असे महेता यांनी सांगितले.

निलंबन करा, अन्यथा कामकाज चालू देणार नाही!
सुरुवातीला हा विषय मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी सोशल मीडियावर मोपलवार यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपचा उल्लेख करत मोपलवारांचा संवाद वाचून दाखवला. कोटींची भाषा यामध्ये अधिकारी करत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या व्यक्तीवर आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो जामिनावर आहे. सीबीआय त्याची चौकश करत आहे मग त्याला का पाठीशी घातलं जातेय? असा सवाल करत आताच्या आता त्या अधिकार्‍याला निलंबित करा नाही तर सभागृह चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका पवार यांनी घेतली.

आता घाटकोपरच्या भूखंडावरून महेतांना घेरले
मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे म्हणून परस्पर फाईली मंजूर करण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांसमोर विधानसभेत उघड झाल्यानंतर अडचणीत सापडलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विधानसभेत आधीच्या प्रकरणावरून महेता यांच्या राजीनाम्याची मागणी करणार्‍या विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचे नवीन भ्रष्टाचाराचे प्रकरण विधानसभेत उघडकीस आणले. घाटकोपर येथील सीटीएस 194 हा भूखंड 1996 साली निर्मल नावाच्या विकासकाला दिली होता. 10 वर्ष होऊनही सदर भूखंडाचा विकास न झाल्याने 2006 साली म्हाडाने हा भूखंड परत घेतला. 2017 साली हाच भूखंड गैरमार्गाने पुन्हा त्याच विकासकाला दिला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केला. यामुळे गृहनिर्माण मंत्र्यांना तात्काळ हटवा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी अध्यक्षांनी शासनाने ताबडतोब दखल घ्यावी आणि कारवाई करावी असे निर्देश दिले. मात्र तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कामकाज सुरूच राहिल्याने विरोधकांनी वेलमध्ये बसून घोषणाबाजी केली.

खडसेंचा वारंवार उल्लेख
दरम्यान, महेता यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना ‘खडसे साहेबांना वेगळा न्याय आणि महेतांना वेगळा न्याय का?‘ असा सवालदेखील अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांनी यावेळी केला. खडसे साहेबांना घालवलं. आपल्या गटाचा असेल तर घालवायचा नाही, दुसर्‍या गटाचा असेल तर घालवायचा प्रकार सुरू असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. यावेळी खडसे हे सभागृहात उपस्थित होते. आमदार अनिल गोटे यांनीदेखील मोपलवारवर आरोप केले असल्याचा उल्लेखदेखील विरोधकांनी केला व अनिल गोटेंना बोलू द्या, अशाही प्रतिक्रिया विरोधकांकडून येत होत्या.

संशय उपस्थित झालाय, चौकशी करू!
मोपलवार यांच्या निलंबनाचा दबाव वाढल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वृत्तवाहिन्यांनी संबंधित ऑडिओ क्लिप व्हेरिफाय केलेली नसल्याचे सांगितलेले आहे. त्यामुळे संशय उपस्थित झाला आहे. त्यांची सर्व चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी बापट यांनीही सरकार कुणालाही पाठीशी घालत नाही, किमान चौकशी होणे गरजेचे आहे, चौकशी करून कारवाई करू असे सांगितले. मात्र विरोधक कुठल्याही स्थितीत ऐकायला तयार नव्हते. प्रकरण आलेय मग त्याची शहानिशा करायची नाही का? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी खुनाच्याप्रकरणी देखील चौकशी करावी लागते असे सांगितले. तर शिक्षणमंत्री तावडे यांनी कुठल्याही मंत्र्यांवर आरोप करण्याआधी नोटीस द्यावी लागते मात्र तशी कुठलीही नोटीस दिली नाही, त्यामुळे हा विषय कामकाजावरून काढण्याची मागणी केली यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत सभात्याग केला.