मुंबई । कथित ऑडियो क्लिप प्रकरणावरून दोन दिवस गदारोळ झाल्यानंतर अखेर एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची चौकशी होईपर्यंत पदावरून हकालपट्टी करण्याची घोषणा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यावर काहीही निर्णय न झाल्याने विरोधकांनी जोरदार गोंधळ केल्याने दुपारी 1 वाजताच विधानसभेचे कामकाज पूर्ण दिवसाकरिता स्थगित करण्यात आले. गुरुवारी पावसाळी अधिवेशनात कामकाज सुरू झाल्यापासूनच मोपलवार यांचे निलंबन व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी वेलमध्ये उतरून गोंधळ सुरू केला. यामुळे तब्बल पाच वेळा कामकाज काही काळापुरते तहकूब करावे लागले. अखेर मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांना चौकशी होईस्तोवर पदावरून दूर करण्याचे निवेदन केले. मात्र महेतांवर कुठलेही भाष्य न करता ते निघून गेले. यामुळे विरोधकांनी बॅनर फडकवत घोषणाबाजी सुरू केल्याने कामकाज पूर्ण दिवसासाठी तहकूब करावे लागले.
पाचदा कामकाज तहकूब
विरोधकांनी राधेश्याम मोपलवार यांचा फोटो असलेला बॅनर सभागृहात लावला. या बॅनरवर ’वाट्टेल ते करा, सरकार सरकार माझे बिघडवू शकत नाही’ असे लिहिलेले होते. विरोधक गोंधळ करत वारंवार वेलमध्ये उतरत होते. त्यामुळे पाच वेळा विधानसभा तहकूब करावी लागली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मोपलवार यांच्या व्हिडियो क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काल महिन्याभरात चौकशी करू असे सांगितले होते मात्र विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी आज सुरुवातीपासूनच त्यांच्या चौकशी व निलंबनाची मागणी लावून धरली. अखेर विरोधकांच्या मागणीपुढे झुकत मुख्यमंत्र्यांनी त्यांना चौकशी होईपर्यंत पदावरून हटविण्याची घोषणा केली. यावेळी ‘मी कालच सांगितले आहे. एक महिन्याच्या आत फॉरेन्सिक चौकशी करण्यात येईल. परंतु विरोधी पक्षाकडून मोपलवारांना हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मोपलवारांना चौकशी होईपर्यंत पदावरून बाजूला करण्यात येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. यावेळी तुमच्या काळातील कामाचे हे भ्रष्टाचाराचे आरोप आहोत, असे सांगण्यास देखील मुख्यमंत्री विसरले नाहीत.
मोपलवार सरकारचा जावई आहे का?
कामकाजच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोपलवार यांच्यावर कारवाईची मागणी करत स्थगन प्रस्तावाची सूचना केली. ज्या व्यक्तीशी मोपलवारांचे बोलणे व्हायचे तो सतीश मांगले हा व्यक्ती 11 महिन्यांपासून घरी गेलेला नाही. त्याला धमक्या दिल्या जात आहेत. त्याच्या कुटुंबाला वेठीस धरले जात असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. या मोपलवारांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनीच 1 जानेवारी 2017 रोजी दिले होते. आ. गोटे यांनी देखील याबाबत तक्रार केली आहे, असे सांगत विखे पाटील यांनी मोपलवार यांना तात्काळ हटविण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनीही पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रकरणी चौकशी बाबत मुख्यमंत्री कार्यालयाला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत असे सांगत एवढे असताना मोपलवारांचा बचाव का केला जातोय? तो काय सरकारचा जावई आहे का? असा सवाल केला.
मेहतांना मात्र अभय
कामकाज सुरू झाल्यानंतर मोपलवार आणि महेता यांच्या विरोधात प्रचंड गोंधळ सुरू झाला. मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांना हटविण्याची घोषणा केल्यानंतर महेता यांच्यावर ते काही भाष्य करतील असे वाटत होते मात्र त्यांच्यावर काहीही न बोलता मुख्यमंत्री सभागृहाबाहेर गेले. यानंतर महेतांच्या निलंबनाची मागणी विरोधकांनी लावून धरली. अजित पवार यांनी महेतांनी सही केलीय हे सिद्ध झालेय मग कारवाई का नाही? असा प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरले. विखे पाटील यांनीही एकनाथराव खडसेंना आरोप सिद्ध होण्यापूर्वी राजीनामा द्यायला सांगितला होता मग महेतांवर आरोप आहेत तर का राजीनामा नाही, असा आरोप लावत राजीनाम्याची मागणी केली. यावेळी विरोधकांनी ’प्रकाश मेहता का उलटा चष्मा’, ’मी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली, पण मी राजीनामा देणार नाही’ असे फलक सभागृहात झळकावले.
विधान परिषदेतही गोंधळ
मेहता आणि मापलवर यांचे प्रकरण विधानपरिषदेतही गाजले. यातच सत्ताधारी सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. नंतर मात्र कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यानी मोपलवार आणि प्रकाश मेहता प्रकरणावरून सरकारला जाब विचारत सरकारच्या पारदर्शकतेच्या विश्वासाला तडा जात असल्याचे त्यानी म्हटले. नैतिकता आणि पारदर्शकतेचा टाहो फोडणार्या सरकारने प्रकाश मेहतानी राजीनामा घ्यावा अशी मागणी शारदा रणपिसे यांनी केली आणि मुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत असा जाब त्यांना विचारला. मेहतांच्या राजीनाम्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याचा इशारा विरोधकांनी दिला. या मागणीमुळे आपण त्यांची चौकशी करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली मात्र त्याने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यावरून प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले.