आषाढीपूर्वी सुरु होणार नवीन सुविधा
पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनाची लांबच लांब दर्शन रांग आता इतिहासजमा होणार आहे. मंदिर समितीने विठ्ठल भक्तांसाठी विठुरायाच्या दर्शनासाठी मोफत टोकन दर्शन व्यवस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वारकर्यांना आता थेट आषाढी एकादशीला देखील तासाभरात देवाचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. महत्वाची म्हणजे मंदिर समितीच्या बैठकीत वारकर्यांच्या मागणीची दखल घेऊन पंढरपुरात मांत्र व मद्य विक्रीबंदी करण्याचा ठरावही संमत करण्यात आला आहे.
30 ठिकाणी मिळणार दर्शनपास
मंदिर समितीने त्रिलोक सिक्युरिटी सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार करून ही व्यवस्था या कंपनीकडे दिली आहे. येत्या काही दिवसात शहरात 30 महत्वाच्या ठिकाणी हे दर्शनपास वितरित केले जातील. भाविकांना वितरित करण्यात आलेल्या टोकनवर दर्शनाची वेळ असल्याने या भाविकांनी थेट त्याच वेळी दर्शनासाठी मंदिराकडे जायचे आहे. 15 लाख टोकनपास मंदिर समितीकडे तयार करण्यात आले आहेत. या मध्ये पायावरील दर्शन, मुखदर्शन आणि भोजन प्रसाद अशा तीन प्रकारच्या टोकनची व्यवस्था करण्यात आली आहे.
विठुची पंढरी होणार शुद्ध शाकाहारी
विठुरायाच्या नगरीमधील बाटली आडवी करण्यासाठी आता पुन्हा वारकरी संप्रदायाने जोरदार तयारी केली आहे. मंदिर समितीच्या बैठकीत शहरातील मांस तसेच मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला आहे. पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असून इथे मांस आणि मद्य विक्री बंद करावी, या मागणीसाठी वारकरी संप्रदाय गेली अनेक वर्षे मागणी करत आहे. वारकरी संघटनांनी पुन्हा मंदिर समिती बैठकीपूर्वी आपल्या मागण्याची निवेदने मंदिर समितीकडे दिली होती. याचे पडसाद मंदिर समितीच्या बैठकीत दिसून आले आले. बहुतांश सदस्यांनी वारकरी संप्रदायाच्या मागणीला एकमुखाने पाठिंबा दर्शवल्याने, बैठकीत शहरातील मांस-मद्य विक्रीवर बंदीचा ठराव घेण्यात आला. आता मंदिर समिती हा ठराव शासनाकडे पाठवणार असून समिती अध्यक्ष आणि सदस्य असलेले दोन आमदार त्यााच मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहेत.