जळगाव । तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील मोफत बस सेवेतील घोटाळ्यात सहभागाचा आरोप असलेल्या नगरसेवकांना त्यांची बाजू मांडता यावी म्हणून आयुक्त जीवन सोनवणे 49 आजी माजी नरसेवकांची प्रत्येकी 5 लाख 14 हजार रूपयांची वसुलीसाठी 1 ते 4 मार्च रोजी सुनावणी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या नगरसेवकांच्या सुनावणीत आज बुधवार 1 मार्च रोजी पहिल्या दिवशी 11 जणांची सुनावणी घेण्यात आली. यात प्रदिप रायसोनी यांच्यातर्फे अॅड. गोंविद कन्हैय्यालाल वानखेडे , महेंद्र सपकाळे, लक्ष्मीकांत चौधरी यांच्यातर्फे अॅड. डी. एच. परांजपे यांनी हजेरी लावली होती.
पुढील सुनावणी 23 मार्च रोजी
अफजल खान पटवे, अशोक सपकाळे, मंजुळा कदम, डिंगबर वाणी, पुष्पा पाटील, शांताराम सपकाळे, इक्बालोद्दीन पिरजादे, सुभद्राबाई नाईक हे स्वतः हजर झाले होते. शिवचरण ढंढोर यांना हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांना नोटीस मिळाली नव्हती त्यामुळे ते 6 मार्च रोजी हजर राहणार आहेत. सर्व नगरसेवकांचे वकीलपत्र अॅड. डी. एच. परांजपे यांनी घेतले. खुलासा देण्यासाठी वकीलांनी 23 मार्चपर्यंतचा अवधी मागून घेतला असता त्यांना अनुमती देण्यात आली आहे. लेखापरीक्षक डी.आर. पाटील, लेखापरीक्षण विभागाचे अनिल बिर्हाडे, रविंद्र कदम उपस्थित होते. नगरसेवकांच्या वकीलांना मोफत बस सेवासंदर्भांतील कागदपत्रांची आभ्यास करण्यासाठी आयुक्त जीवन सोनवणे यांच्याकडे मुदत मागितली. आयुक्त सोनवणे यांनी सर्व नगरसेवकांना 23 मार्च रोजी आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.