पुणे । पुणे स्मार्ट सिटी आणि महापालिकेकडून शहरात सुरू करण्यात आलेल्या मोफत वाय-फाय सुविधेचा लाभ गेल्या महिनाभरात तब्बल 5 लाख पुणेकरांनी घेतली आहे. या शिवाय, दरदिवशी शहरात सरासरी 6 हजार जण या सेवेचा लाभ घेत असून ही सेवा पुणेकरांच्या पसंतीस उतरली असल्याचे चित्र आहे. या मोफत वाय-फाय सेवेला 26 जानेवारी 2017 पासून सुरुवात करण्यात आली असून त्याची महिनाभराची आकडेवारी पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात सुमारे 150 ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यात प्रमुख उद्याने, महाविद्यालये, पोलिस ठाणी तसेच प्रमुख शासकीय कार्यालयांचा समावेश आहे.
सोशल मीडियाचा वापर जास्त
या सर्वच ठिकाणी स्मार्ट सिटीकडून माहितीचे फलक लावण्यात आलेले असल्याने नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिन्याभरात महापालिका भवन, सिंबायोसीस सोसायटी संग्रहालय तसेच कल्याणीनगर स्टीलसमोर वाय-फायचा सर्वाधिक वापर झाला आहे. त्यात प्रामुख्याने सोशल मीडिया तसेच शासकीय कामकाजाशी संबधित वापर अधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दररोज 2.48 टीबी डाऊनलोड
गेल्या महिन्याभरात या सेवेचा लाभ घेणार्या वापर करणार्यांकडून 150 ठिकाणी तब्बल 7.20 टेरा बाईटस(टीबी) एवढा डाटा अपलोड करण्यात आला आहे. तर याच कालवधीत तब्बल 72.36 टीबी एवढा डाटा वाय-फाय वरून डाऊनलोड करण्यात आला आहे. तर दरारोजचे डाऊनलोडचे सरासरी प्रमाण 2.48 टीबी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. डाऊनलोड केल्या जाणार्या डाटामध्ये दैनंदिन कामकाजाशी संबधित कागदपत्रे, सोशल मीडियावरील माहिती, तसेच व्हिडीओ कॉलिंगचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.