मोबाइलपायी मुलाने घेतला गळफास

0

पुणे : मुलांमधील मोबाईलचे आकर्षण आणि सतत मोबाईलमध्ये गुंतुन राहण्याच्या प्रकाराचा अवघ्या 13 वर्षाचा मुलगा बळी गेला. पालकांनी मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करायला सांगितल्याचा राग आल्याने मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

अथर्व मनीष भुतडा (13, रा. धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुतडा कुटुंबीय गणेशनगर भागामध्ये राहते. अथर्व हा धनकवडी येथील सरहद शाळेमध्ये आठवीत शिकत होता. अथर्व हा सतत मोबाईल हातात घेऊन खेळत असे. मोबाईलचा वापर न करण्यासंदर्भात पालक अनेकदा त्यास सांगत. त्याची परीक्षा जवळ आल्याने सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आईने त्यास मोबाईल बाजुला ठेवून अभ्यास करण्यास सांगितले. आईने अभ्यास करायला सांगितल्याचा अथर्वला राग आला. त्यानंतर नेहमीप्रमाणे तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. दुपारी साडे तीन वाजता खोलीमध्ये गेलेला अथर्व सायंकाळी साडेसहापर्यंत बाहेर आला नाही. म्हणून पालकांनी खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने दरवाजा उघडला नाही. दरम्यान शेजारील रहीवाशांनी खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अथर्वने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याच्या पालकांनी व नागरीकांनी त्यास तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.